खोटारड्या सरकारचा निषेध! केंद्र व राज्य सरकारविरोधात काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्याला फासला चिखल

CHANDRAPUR-CONGRESS-PROTEST

केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले अनेक निर्णय अन्यायकारक असून हे सरकार देशातील बेरोजगार तरुण, महिला, विद्यार्थी यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत दोन्ही सरकारांविरोधात आज विदर्भासह राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. चंद्रपूर शहरात देखील चिखलफेक आंदोलनाचा जोर पाहायला मिळाला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखलफेक आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकार बेरोजगारांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसून बेरोजगारी वाढतच चालली आहे तसेच हे सरकार शेतकरी विरोधी आहे, असे आरोप यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले.

चंद्रपुरातील गांधी चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुभाष धोटे आणि शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. मात्र, सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. नीटसारख्या परीक्षेत घोटाळे होत आहेत. राज्यातही शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसून शिंदे सरकार सगळ्या आघाड्यांवर सपशेल फेल ठरले आहे. या सगळ्याचा निषेध म्हणून आज आंदोलन करण्यात आलं.

यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, महिला शहर काँग्रेस अध्यक्ष संगीता अमृतकर, महिला ग्रामीण अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, अश्विनी खोब्रागडे, के के सिंग, विनायक बांगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.