
चोरीच्या गुन्ह्यात जोगेश्वरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी अंकुश गव्हाणेने कायदेशीर रखवालीतून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अंकुशच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
नुकतेच जोगेश्वरी पश्चिम येथे एका घरात अंकुशने चोरी केली होती. चोरी केल्यानंतर तो पळून जात होता. तेव्हा जोगेश्वरी पोलिसांचे पथक गस्त करत होते. पोलिसांनी पाठलाग करून अंकुशला ताब्यात घेतले. त्याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने अंकुशला आर्थर रोड जेलमध्ये नेले जात होते. सरकारी वाहन उपलब्ध न झाल्याने त्याला खासगी वाहनातून आर्थर रोड जेलमध्ये नेले जात होते. अंकुशला बेडी लावून अंधेरी पूर्व येथील टॅक्सी स्टॅण्डजवळ पोलीस आले. संधीचा फायदा घेत अंकुशने पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळ काढला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पाटील याने अंकुशचा पाठलाग केला. मात्र गर्दीचा फायदा घेऊन अंकुश पळून गेला. याची माहिती अंधेरी पोलिसांना देण्यात आली.



























































