
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतील मेनका… म्हणजेच मीरा जोशी. यात ती काहीशी खलनायिका म्हणून दिसत असली तरी ती एक गोड मुलगी आहे.लोक माझा मेनकाचा रोल पाहतात आणि माझा तिरस्कार करतात… त्याचा वेगळा आनंद वाटतो. कारण असे लोक रिअल लाईफ आणि रिल लाईफ यातला फरक ओळखत नाहीत. मीरा जोशी आपलं मनोगत उलगडत होती. मीरा एक निःस्सीम आणि मनस्वी अभिनेत्री… नृत्यदिग्दर्शिका म्हणून कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर तिला अचानक अभिनेत्री व्हायची संधी मिळाली आणि ती त्यातही जोमाने पुढे जातेय… मीरा म्हणते, अभिनेत्री असले तरी नृत्य हा माझा आत्मा आहे. फेसबुकवर, व्हॉट्सअपवर मला ‘तू रस्त्यात कुठे भेटलीस तर खूप मारेन’ असे मेसेजेस येतात.
मीरा मूळची रत्नागिरीची… तिचे बाबा बँकेत आणि आई प्राध्यापिका… बाबा बँकेत असल्याने दर तीन वर्षांनी त्यांची बदली व्हायची. त्यामुळे तिला पाच सहा शाळा बदलाव्या लागल्या. त्यामुळे ती वेगवेगळ्या ठिकाणी राहिली. पण लहानपणापासूनच तिला डान्सची आवड. त्यामुळे ती कत्थक, भरतनाटय़म शिकली.नृत्य आणि अभिनय या दोन्ही बाजू खणखणीत करणाऱया मीराला फक्त अभिनयात करीयर करायचं नाही. तिला नृत्यामध्येही काहीतरी करून दाखवायचंय. ती म्हणते, नृत्यामध्ये पारंगत आहे आणि तीच माझी पहिली आवड आहे असंही ती स्पष्ट करते.




























































