
खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदी पात्रात महाकाय मगर मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्यावर तरंगणाऱ्या या महाकाय मगरीला बाहेर काढून शवविच्छेदनानंतर तिची विल्हेवाट लागली. मगरीच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
गतवर्षी लोटे येथील रासायनिक सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणामुळे जगबुडी नदीपात्रात मगरी मारण्याचे प्रमाण कमालीचे वाढले होते. दर आठ दहा दिवसाच्या फरकाने जगबुडी नदीपात्रात मृत मगर पाण्यावर तरंगताना आढळून येत होती. मात्र मगरीच्या मृत्यूचे खरे कारण तेव्हा ही कळले नव्हते. या वर्षी पहिल्यांदाच आज खेड शहरालगत नदीपात्रात महाकाय मृत मगर पाण्यावर तरंगत असल्याचे काही नरगरिकांनी पहिले. वनविभागाला याबाबत खबर दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाण्यावर तरंगत असलेल्या मृत मगरीला महत्प्रयासाने बाहेर काढले.
बारमाही वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात शेकडो मगरीचे वास्तव्य आहे. या मगरी नदीच्या डोहात अगदी मनसोक्त डुंबत असतात. भर उन्हात डोहाकाठच्या खडकावर येऊन विसावतात. माणसांची चाहूल लागली की पुन्हा पाण्यात सूर मारून क्षणार्धात दिसेनाशा होतात. डोहामध्ये असलेल्या शेकडो मगरीना संरक्षित करण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी येथील देवणे डोहावर क्रोकोडाईल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव त्यांनी गेल्याच महिन्यात शासनाकडे सादरही केला. मंजुरी मिळताच कामाला सुरवात करण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे.
भविष्यात या नदीत क्रोकोडाईल सफारी करता येणे शक्य होणार आहे. दरम्यान त्याच जगबुडी नदीत आज महाकाय मगर मृतावस्थेत आढळून आल्याने मगरीच्या वास्तव्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.




























































