
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयावर शनिवारी पुन्हा एकदा सीबीआयने छापेमारी सुरू केली आहे. मनीष सिसोदिया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसेच याआधीही सीबीआयला छाप्यात काहीही सापडलेले नाही आणि यापुढेही सापडणार नाही. मात्र, त्यांचे स्वागत असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे.
मनीष सिसोदिया यांनी शनिवारी संध्याकाळी ट्विट केले की, ‘आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या ऑफिसवर छापा टाकला, माझ्या लॉकरची झडती घेतली, माझ्या गावात जाऊन चौकशी केली. माझ्याविरुद्ध काहीही सापडले नाही आणि सापडणार नाही, कारण मी काहीही चुकीचं काम केलेले नाही. दिल्लीतील मुलांच्या शिक्षणासाठी प्रामाणिकपणे काम केलं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीबीआयकडून या कारवाईचा इन्कार करण्यात आला. सिसोदिया यांच्या कार्यालयावर किंवा घरावर कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नाही. दस्तावेज जमा करण्यासाठी त्यांना 91 सीआरपीसीनुसार नोटीस पाठवण्यात आली होती. आमचे पथक तेच दस्तावेज घेण्यासाठी सिसोदिया यांच्या कार्यालयात गेले होते, असे सीबीआयने म्हटले आहे.
दिल्लीतील मद्य कायद्यातील कथित घोटाळ्याबाबत सीबीआय तपास करत आहे. या प्रकरणी सिसोदिया यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षई ऑगस्ट महिन्यातही सिसोदिया यांच्या घरी, कार्यालयांवर आणि त्यांच्याशी संबिधत अनेक ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली होती. मात्र, त्यात काहीही सापडलेले नाही.




























































