पावसाची उसंत, दिल्लीला दिलासा; पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात

rain-in-delhi
फाईल फोटो

उत्तर हिंदुस्थानात आणि नवी दिल्लीत पावसाने उसंत घेतल्याने दिल्लीला दिलासा मिळाला आहे. पावसाचे उसंत घेतल्याने यमुना नदीला आलेला पूर हळूहळू ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केल्याने दिल्लीला दिलासा मिळाला आहे.

दिल्लीतील पूरग्रस्त भागातील परिस्थिती सुधारत आहे. दिल्ली आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली होती. यमुनेचे पाणी शहरात शिरले होते. पुराचे पाणी लाल किल्ल्यापर्यंत पोहचले होते. अनेक रस्त्यांना नदीचे रुप आले होते. आता पूर ओसरत असून अनेक भाग अद्याप पाण्याखालीच आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सखल भागात राहणाऱ्या हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

यमुनेचा जलस्तर ओसरू लागला आहे. सध्या दिल्ली आणि वरच्या भागातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता नाही. पूरग्रस्त भागातही परिस्थिती सुधारत आहे. शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यमुनेची पातळी तीन दिवस सातत्याने वाढल्यानंतर शुक्रवारपासून त्यात घट होत आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ही पातळी 207.43 मीटपर्यंत घटला होता. तर गुरुवारी रात्री आठला ही पातळी 208.66 मीटर होती. तथापि यमुनेची पातळी अजूनही 205.33 मीटर असून, धोक्याच्या पातळीच्या दोन मीटरवर वाहत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी सांगितले की यमुना नदीतील पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे आणि जर जोरदार पाऊस झाला नाही तर परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल. दिल्लीतील अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत. नागरिकांना पाणी साचलेल्या भागात जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.