दिल्लीमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 20 हून अधिक गुन्हे दाखल, 30 हजारांहून अधिक पोलीस आणि निमलष्करी जवान तैनातीची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
delhi-police

दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. राजधानीत जबरदस्तीने आंदोलन करणे, कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांखाली दिल्ली पोलिसांनी 20 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि इतर युवा संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

आंदोलनादरम्यान कायदा हातात घेणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सरकारी कामात अडथळे निर्माण केल्याचे आरोप संबंधित प्रकरणांमध्ये करण्यात आले आहेत. कनॉट प्लेस, कर्तव्य पथ आणि बाराखंबा यांसह दिल्लीतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान गोंधळ घालणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पोलीस सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत.

जंतरमंतरवरील आंदोलनाला परवानगी नाकारली

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने रविवारी, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जंतरमंतर येथे पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सलग दुसऱ्या दिवशीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संभाव्य गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन दिल्लीमध्ये 30 हजारांहून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्याची तयारी करण्यात आली आहे.

यापूर्वी शनिवारी, 10 ऑक्टोबर रोजी आंदोलकांना जंतरमंतरपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती. यावेळी अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. शनिवारीही पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती.

दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांवर सुरक्षा वाढवली

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि इतर महत्त्वाच्या वाहतूक केंद्रांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राजधानीत कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांना मदत करण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPF) 120 हून अधिक कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. नवी दिल्ली जिल्ह्याचे 20 विभागांमध्ये विभाजन करण्यात आले असून, संयुक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त प्रत्यक्ष घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.