
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पैशांसाठी जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या चिमुरडीला सव्वा लाख रुपयांत विकल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील मंगोलपुरी भागात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आईला ताब्यात घेण्यात आले असून ज्या व्यक्तिने मुलीला विकत घेतले पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दिल्ली महिला आयोगाकडे 3 जानेवारीला एका महिलेने तक्रार केली होती. ज्यात तिने शेजारी राहणाऱ्या महिलेने तिची 3 दिवसांची मुलगी विकल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर महिला आयोगाने एक टीम तक्रार करणाऱ्या महिलेच्या घरी पाठवली. संबंधित महिलेने टीमला शेजारच्या घरी नेले. त्यावेळी आरोपी महिलेने 3 दिवसांची मुलगी विकल्याची कबुली दिली. पतीला दारुचे व्यसन असून तो बेरोजगार असल्याने पैशांसाठी मुलीला विकल्याचे तिने महिला आयोगाला सांगितले. तसेच फर्टीलिटी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका महिलेच्या ओळखीनेच सव्वा लाखात मुलगी विकल्याचेही ती म्हणाली. त्यानंतर महिला आयोगाची टीम पोलिसांसह संबंधित फर्टीलिटी क्लिनिकमध्ये गेली. त्यावेळी एका महिलेच्या मदतीने ग्वाल्हेर मधील एका पुरुषाला ती मुलगी पाच लाखात विकल्याचे व त्यातील सव्वा लाख रुपये मुलीच्या आईला दिल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. मात्र मुलीला घेऊन जाणाऱ्या पुरुषाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे तिने सांगितले. यामुळे पोलीस त्या पुरुषाचा शोध घेत आहे.





























































