धर्मेंद्र प्रधान यांना अखेर जावे लागले! झुरळांनी चिरडला सरकारचा माज, ‘जेन-झी’चे आंदोलन मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या झुरळांनी अखेर सरकारचा माज चिरडला. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱया ‘जेन-झी’वर लाठीचार्ज करत आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. पण, आंदोलक विद्यार्थी आपल्या मागणीवर शेवटपर्यंत ठाम राहिल्याने धर्मेंद्र प्रधान यांना अखेर पदावरून जावे लागले. दरम्यान,  दिल्लीच्या जंतर-मंतर येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीने मागे घेण्याची घोषणा केली. तूर्तास शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

नीट पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सीजेपीकडून करण्यात आली. याच मुद्द्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हेदेखील बेमुदत उपोषणाला बसले होते. या आंदोलनाला देशभरातून विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळत होता. विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत संसदेच्या पावसाळी अधिवेशात मोदी सरकारची कोंडी केली होती. पोलीस बळाचा वापर करत जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला खरा, पण आंदोलक विद्यार्थी एकजूट दाखवत शेवटपर्यंत आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देणे भाग पडले. प्रधान यांनी दोन पानी पत्र लिहीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रधान यांच्या राजीनामा पत्रात काय?

मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारताची युवाशक्तीच या देशाची खरी ताकद आहे. जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, देशाची एकता कायम राहावी, भारतातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये, आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यासात घालवावा आणि करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे, असे प्रधान यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.