नुडल्सच्या पाकिटामध्ये हिरे तर, अंतर्वस्त्रामध्ये सोने; कस्टमच्या कारवाईत 6.46 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

कस्टम डिपार्टमेंटने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत हिरे आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण 6.46 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अतिशय वर्दळीच्या मुंबई विमानतळावर कस्टम डिपार्टमेंटने मोठी कारवाई केली आहे. आरोपींनी मॅगिच्या पाकिटामध्ये हिरे लपवले होते. तर अंतर्वस्त्रामध्ये सोनं लपवून पळ काढण्याचा प्रयत्न होता. आरोपींकडे एकूण 6.46 कोटी रुपयांचा मुद्देमाल होता. यामध्ये 4.44 कोटी रुपये किंमतीचे 6.8 किलोग्राम पेक्षा अधिक सोने आणि 2.02 कोटी रुपये किंमतीच्या हिऱ्यांचा समावेश आहे. सदर प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींव्यतिरिक्त एका अन्य आरोपीला सुद्धा तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे.

“कोलंबोतून मुंबईमध्ये आलेल्या एका विदेशी प्रवाशाची तपासणी करण्यात आली होती. त्याने त्याच्या अंतर्वस्त्रामध्ये सोन्याची बिस्किटं लपवून ठेवली होती. त्यांचे वजन 321 ग्रॅम होते,” अशी माहिती एका कस्टम अधिकाऱ्याने दिली. याव्यतिरिक्त दुबईवरून आलेल्या दोन आणि अबु धाबीवरून आलेल्या दोन प्रवाशांची तपासणी केली. तसेच बहरीन, दोहा, रियाद, मस्कट, बँकॉक आणि सिंगापूर वरून आलेल्या प्रत्येकी एका प्रवाशाची अशी एकून 10 हिंदुस्थानी प्रवाशांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 6.199 किलोग्राम सोने जप्त करण्यात आले. याची किंमत 4.04 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी 10 प्रवाशांपैकी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.