एका PNR वर आता विमानात लहान मुलांनाही मिळणार हक्काची सीट; DGCA चे आदेश

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Directorate General of Civil Aviation (DGCA) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता लहान मुलांसाठी एक सीट आरक्षित ठेवणे विमान कंपन्यांना अनिवार्य असणार आहे.

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असतात. प्रवाशांनाही आरामदायक प्रवास मिळावा अशी आशा असते. मात्र बऱ्याच वेळा विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना बसतो. वाढीव तिकीट, वेळेमध्ये विमान उड्डाण न होणे आणि लहान मुलांना सीट देण्यावरूनही बरेच वाद होत असतात. मात्र आता DGCA ने 23 एप्रिल 2024 रोजी महत्त्वाचा निर्णय घेत एक आदेश जारी केला आहे. यानुसार विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना 12 वर्षांखालील मुलांना किमान एक सीट द्यावी लागणार आहे.

“विमान कंपन्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना त्यांच्या पालकांसह समान PNR वर प्रवास करणाऱ्या मुलांना किमान एक जागा मिळेल. तसेच सीट देण्याचा रेकॉर्ड ठेवावा लागणार आहे,” असे DGCA ने आपल्या आदेशात म्हटले आहे.