
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रेल्वेला होत असलेला प्रचंड तोटा पाहून प्रवासी आणि मालगाड्यांचे परिचालन आता खासगी ऑपरेटर्सद्वारे करण्याचा विचारापर्यंत रेल्वे प्रशासन आले असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे वरिष्ठ सदस्य (दळणवळण) गिरीश पिल्लई यांनी दिली आहे. रेल्वे वाहतूक संशोधन केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जगभरात ट्रेनच्या वाहतुकीत अनेक बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे माझ्या मते आपल्या देशातही आता प्रवासी गाडय़ांचे परिचालन करण्याची जबाबदारी खासगी ऑपरेटरांच्या हाती देण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची वेळ आली असल्याचे पिल्लई यांनी यावेळी सांगितले. अर्थात खासगी कंपन्यांना भाडे ठरविण्याचा तसेच टर्मिनल निर्माण करण्याचा अधिकार द्यायचा की नाही यावर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ञ विचार करीत आहेत. रेल्वेच्या मालवाहतुकीच्या क्षेत्राला प्रवासी वाहतुकीपासून वेगळे करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
गर्दीच्या मार्गावर ‘मेमू’चा पर्याय
रेल्वेच्या पॅसेंजर गाडय़ा चालविण्याऐवजी त्या जागी ‘मेमू’ ट्रेन चालविण्याचा विचार करीत आहे. अन्य एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले की, रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होऊन गर्दीच्या मार्गांवर वाहतूककोंडीही कमी होईल. मेमू ट्रेन सुरू झाल्याने प्रवासाला कमी वेळ लागेल. कारण अशा ट्रेन विजेवर धावत असून लवकर वेग पकडतात. अशा मेमू ट्रेन 300 ते 500 कि.मी.पर्यंतच्या अंतरावर चालविण्यात येतात, असे रेल्वे बोर्डाचे सदस्य रोलिंग स्टॉक राजेश अग्रवाल यांनी सांगितले. ‘स्वर्णिम चतुर्भुज’ योजनेद्वारे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांना एकत्र जोडण्याचा विचार सुरू असल्याचे या अधिकाऱयाने सांगितले.





























































