
‘एका माणसाला हीरो बनवण्याच्या सवयीमुळे आपल्या देशाचा सत्यानाश झाला आहे. ही चूक पुन्हा होता कामा नये. मला कोणीही हीरो करण्याचा प्रयत्न करू नका,’ असे आवाहन कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी बोलताना केले. शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. त्यांचा रोख नरेंद्र मोदी यांच्यावर होता.
प्रधान यांचा राजीनामा सरकारने घेतल्याची घोषणा दीपके यांनी ’जंतरमंतर’वर केली. त्यानंतर जेन-झी आंदोलकांनी एकच जल्लोष केला. यावेळी दीपके यांनी तरुणांशी संवाद साधला. ‘मी सर्वांना सॅल्यूट करतो. हा जो राजीनामा आला आहे, त्यासाठी कोणी मला हीरो बनवू नका. एका व्यक्तीला हीरो बनवण्याच्या आपल्या सवयीमुळेच देशाचा सत्यानाश झाला आहे. एका व्यक्तीला तुम्ही संविधानापेक्षा मोठे केले. सर्व संस्थांपेक्षा मोठे केले. प्रत्येक गोष्टीपेक्षा मोठे केले. अशा पद्धतीने कोणालाही हीरो बनवले तर सत्यानाशच होणार, असे दीपके म्हणाले.
हे म्हणायचे, आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत!
अभिजीत दीपके यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या हडेलहप्पी वर्तनावरही हल्ला चढवला. ‘हे काय म्हणायचे आठवते का? हे म्हणायचे की, आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आलाय. त्यांना जावे लागलेय. झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए,’ असा टोला दीपके यांनी हाणला.
हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक
दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. युवा पिढीने शांततेने आणि संयमाने आपल्या भावना देशातील नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आले. मी स्वतः पंतप्रधानांना भेटलो. त्यांना विनंती केली की, लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता आहे. त्याचा परिणाम आज दिसला, असे पवार म्हणाले.
शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया रुग्णालयातून दिली आहे, हा लोकशाहीचा विजय आहे. थेट रस्त्यांवरून प्रत्यक्ष लोकशाहीचा विजय झाला आहे. शांतता, संयम आणि चिकाटीचा हा विजय आहे. सीजेपी तसेच जेन झीचे अभिनंदन आणि ज्यांनी भीती झुगारून देशाच्या कानाकोपऱ्यातून उठाव केला, त्या सर्व नागरिकांचे आभार! उत्तरदायित्वापासून, आता सुधारणांकडे… असेही सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे.




























































