
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती व नियोजनासाठी आज ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अनुपस्थित होते. भाजपच्या समन्वय समितीमधूनही खडसे यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या खडसे यांनी भाजपच्या नियोजन समितीपासून लांब राहणे पसंत केल्याचे सांगण्यात येते.
भोसरीतील जमीन व्यवहार प्रकरणावरून एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपद गमावावे लागल्यानंतर खडसे यांना भाजपने दूरच ठेवले होते. या वागणुकीबद्दल खडसे यांनी अनेकदा जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा त्यांनी जाहीर सभेतून भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. आता लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी समन्वय समिती नेमण्यात आली असून या समितीमध्येही खडसे यांना स्थान दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे खडसे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावरील भाजपच्या नियोजन समितीच्या बैठकीपासून लांबच राहणे पसंत केले.
लोकसभा निवडणुकीतील कामाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. या बैठकीला खडसे अनुपस्थित राहिल्याने लोकसभा निवडणुकीच्या कामात खडसे यांच्यावर कोणताही जबाबदारी सोपविण्यात येणार नाही हे स्पष्ट होते, पण या बैठकीला आपण उपस्थित राहू शकणार नाही असे खडसे यांनी बुधवारी रात्रीच पक्षश्रेष्ठीना सांगितले होते असा दावा भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी केला. ‘वर्षा’ बंगल्यावरील या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही अनुपस्थित होते.





























































