नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना

नगरविकासमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे कोरोना चाचणी बुधवारी पॉझिटिव्ह आल्याबाबतची माहिती दिल़ी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतिची विचारपूस करून ‘लवकर बरे होऊन, सेवेत रुजू व्हा’ अशा शुभेच्छा दिल्या.

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून विभागातील कोरोना रुग्णालयांना भेटी. कोरोनासाठी उभारण्यात आलेली व्यवस्था याचा प्रत्यक्ष भेट घेऊन मंत्र्यांकडून आढावा घेतला जात आहे. एकनाथ शिंदे यांनीही रुग्णालयांना भेटी देऊन कोरोना उपचारांच्या व्यवस्थेची पाहणी केली. त्याचप्रमाणे विविध विकास कामांची पाहणी, बैठका यात व्यस्त असतानाच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सगळ्यांच्या आशीर्कादाने आपली प्रकृती ठीक असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी केली विचारपूस

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ‘एकनाथ शिंदेजी काळजी घ्या, गेले सहा महिने करोनाविरोधातला लढा आपण देखील प्रंटलाइनवरूनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल याची मला खात्री आहेच. पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा,’ अशा शुभेच्छाही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे दिल्या. त्याचप्रमाणे उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार विश्वजीत कदम आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशकंत जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांना लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या