
प्रशांत गौतम
दीपा कुलकर्णी यांचे ‘एकटीचा झिम्मा’ या नावाचे प्रवासवर्णनाचे पुस्तक आधी इंग्रजीत आले आता मराठीतही प्रकाशित झाले आहे. लेखिका दीपा यांनी तीन महिन्यांत युरोपातील तेरा देशांत फिरून भटकंती केली, तीही एकटीने. ऑस्ट्रिया, इटली, व्हॅटिकन सिटी, हंगेरी, चेक रिपब्लिक, जर्मनी, स्पेन,क्रोएशिया, नेदरलँड, बेल्जियम, पोर्तुगाल, फ्रान्स आणि ग्रीस या तेरा देशांतील आलेले अनुभव, भन्नाट व अद्भुत तर आहेतच, पण या अनुभवांना उत्तमोत्तम छायाचित्रात मांडले आहे. जे अनुभव एखाद्या पर्यटकालाही उपयुक्त ठरू शकतात.
‘एकटीचा झिम्मा’ हे पुस्तक अनेक अर्थाने वेगळे आहे. मराठी मुलगी तेरा देशांत एकटीने प्रवास करते. तेही कोणते प्लॅनिंग न करता. कुणालाही सोबत न घेता तीन महिने वेगवेगळय़ा देशांत फिरण्याचा अनुभव घेते. स्वतच फोटो काढते आणि तिला आलेले अनुभवदेखील लिहून काढते. या प्रवासात तिला अनेक चित्र-विचित्र अनुभव आले. ते अनुभव हे पुस्तक वाचताना लक्षात येतात. कोणी तिला हिंदुस्थान अजूनही ज्योतिषी, साप, नाग यांचा देश आहे असे सांगते. त्या वेळी ती त्यांच्यासमोर हिंदुस्थानचे एक वेगळे चित्र ठेवते तेव्हा लोक आश्चर्यचकित होतात.
जर्मनीच्या लोकल ट्रेनमध्ये 12-13 वर्षांची मुलगी सायकल घेऊन आली. दीपाला ते वेगळे वाटले. तिने त्या मुलीचे फोटो काढले. तेव्हा ती मुलगी अचानक चौकस झाली. ‘हे फोटो तुम्ही सोशल मीडियावर टाकणार असाल तर माझा चेहरा ब्लर करा…’ त्या देशात बारा-तेरा वर्षांच्या मुलीमध्ये ही सजगता आहे हा कौतुकाचा विषय नाही, तर आपल्याकडे या वयाच्या मुलींमध्ये ही सजगता कधी येणार हा दीपाने न बोलता विचारलेला प्रश्न आहे. या पुस्तकात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला विचार करायला लावतील, तुम्हाला अंतर्मुख करतील… आणि आपणही एकटीने किंवा एकटय़ाने असा प्रवास केला पाहिजे याची प्रेरणा देतील.





























































