
सामना प्रतिनिधी, नगर
नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी खोटी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पवार यांची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली होती. यामुळे पोलीस महानिरीक्षकांनी पोलीस अधीक्षक डॉ. रंजनकुमार शर्मा यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले, मात्र अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं शाकीर यांचं म्हणणं आहे. चौकशी करून लवकर दोषींवर कारवाई करावी, अन्यथा २० जून रोजी महानिरीक्षक (नाशिक विभाग) येथे उपोषणाला बसू असा इशाराही शाकीर शेख यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
नगर तालुका पोलिसांनी ६ मे २०१८ रोजी दुपारच्या वेळी इनोव्हा आणि इंडिका अशा दोन गाड्या अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून अडवल्या होत्या. यातील इंडिका गाडी पोलिसांनी सोडून दिली होती. त्यानंतर इनोव्हाचा गाडीचालक व मालक याला ७ मे २०१८ रोजी पवार यांनी सोडून दिले आणि हा गुन्हा ७ मे २०१८ रोजी सायंकाळी घडल्याचा बनाव केला असा शाकीर यांनी आरोप केला आहे. या सगळ्या प्रकरणात पवार यांनी मूळ आरोपींना सोडून डमी आरोपी उभे केल्याचंही शाकीर यांचं म्हणणं आहे.
































































