
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘सीएम चषक’चे राज्यस्तरीय अंतिम सामने मंगळवारच्या सकाळपासून मुंबई, नगर आणि पुण्यात सुरू झाले आहेत. महाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वात मोठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा असलेला या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये राज्यातील सर्व जिह्यांतील 45 लाख स्पर्धकांमधून अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकांनी ‘सीएम चषक’च्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. योगेश टिळेकर आणि मोहित भारतीय यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या ‘सीएम चषक’च्या ग्रँड फिनालेमध्ये भाग घेणार्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
‘सीएम चषक’ स्पर्धेत क्रीडा आणि सांस्कृतिक अशा एकूण 12 स्पर्धांमध्ये गाव, गल्ली आणि सोसायट्यांसहित प्रत्येक शाळा, कॉलेज आणि विधानसभा तसेच जिल्हास्तरांवर 8,02,071 सामने आयोजित करण्यात आले. या स्पर्धा एकूण 1,91,911 तासांपर्यंत चालल्या. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सरासरीने 15,000 स्पर्धकांनी ‘सीएम चषक’च्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, ज्यात राज्यस्तरावर एकूण 37,000 स्पर्धक विजेते घोषित झाले. जिल्हा स्तरावर 5000 स्पर्धक विविध स्पर्धामध्ये विजेते झाले. राज्य स्तरावर एकूण 129 विजेते घोषित होतील. स्पर्धेच्या अंतिम समारोप सोहळ्यात महाराष्ट्र स्तरावरच्या विजेत्यांना 28 लाखांची पारितोषिके प्रदान केली जातील.




























































