
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
प्रवासात आपल्या बाजूच्या सीटवर कोणता सहप्रवासी येऊन बसेल ते तसं सांगता येत नाही. त्यातच जर एखादी प्रसन्न व्यक्तीमत्वाची व्यक्ती शेजारच्या सीटवर आली तर सगळा प्रवासचं सुखकारक वाटू लागतो. पण जर एखादी किटकिटी ,आक्रस्ताळी, अनाकर्षक व्यक्ती शेजारच्या सीटवर असेल तर प्रवासाचे खोबरं झालं म्हणून समजा. अशीच काहीशी घटना इंग्लंडमध्ये घडली आहे. विमान प्रवासादरम्यान बाजूच्या सीटवर बसलेल्या अवाढव्य माणसाने सहप्रवाशाचीही अर्धी सीट व्यापली होती. यामुळे प्रवाशाला बसायला नीट जागाच नव्हती. चिरडलेल्या अवस्थेत त्याने कसाबसा प्रवास पूर्ण केला. मात्र प्रवासभर जो त्रास सहन करावा लागला त्यासाठी या दबलेल्या प्रवाशाने विमान कंपनीकडे तिकीटाची रक्कम परत करा अशी मागणी केली.
mirror.co.uk ने याबाबतचे वृत्त दिले आहे ज्यात या प्रवाशाला काय त्रास झाला ते सविस्तर दिलं आहे. ‘विमानप्रवासादरम्यान एक जाड व्यक्ती त्याच्या शरीराचा अर्धा भाग माझ्या सीटवर ठेवून ५ तास प्रवास करत होती. मी त्याच्यामुळे दबलो गेलो होतो. ती जाड व्यक्ती माझ्या सीटच्या जवळ जवळ 1/3 भागावर बसली होती. ज्याचा मला फारच त्रास झाला. त्यानंतर मी विमान कर्मचाऱ्यालाही याबद्दल सांगितले. नंतर त्या क्रूने संबंधित व्यक्तीला दुसऱ्या सीटवर बसण्याची विनंती केली. पण कुठलीही सीट रिकामी नव्हती. यामुळे ती व्यक्ती त्याच सीटवर ५ तास बसून राहिली. यामुळे मी फ्लाईंट अटेंटटला संबंधित व्यक्तीकडून नुकसान भरपाई म्हणून 9400 रुपये मला मिळवून देण्याची मागणी केली.’ असे या प्रवाशाने सांगितले आहे.





























































