
>> आशीष बनसोडे
तब्बल 88 वर्षांनंतर गेल्या वर्षी मुंबई पोलीस दलात मोठय़ा उत्साहाने माऊंटेड पथक सुरू करण्यात आले. सुरुवातीला 13 अश्वांचा सहभाग या पथकात करण्यात आला, पण कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनचा ब्रेक लागला आणि पथकाचे प्रत्यक्षात कामकाज म्हणावे तसे सुरूच झाले नाही. असे चित्र असतानाच या दोन वर्षांत चार अश्वांनी या पथकाची साथ सोडली. गंभीर आजारामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एका अश्वाला काढून टाकण्यात आले. त्यामुळे आता पथकात आठ अश्व राहिले आहेत.
गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताकदिनी माऊंटेड पथकाने शिवाजी पार्क येथे संचलन करून आपल्या कामकाजाला सुरुवात केली होती. या पथकात तेव्हा सहा हिंदुस्थानी आणि सात अरेबियन अश्व दाखल झाले होते. शहरातील वाहतूक व्यवस्था, गर्दी, रहदारीच्या ठिकाणी प्रभावी गस्त घालण्याच्या दृष्टीने माऊंटेड पथक पुन्हा चालना देण्यात आली, पण मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागला आणि हे पथकदेखील थंडावले. मरोळ येथे या पथकाला जागा देण्यात आली आणि तेथेच या अश्वांची राहण्याची, सरावाची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले, पण कालांतराने या पथकाला एका मागोमाग एक धक्के बसू लागले. एक एक करत चार अरेबियन अश्वांनी दोन वर्षांत या पथकाची साथ सोडली. ‘कोलिक’ या पोटाच्या गंभीर आजाराने पदमकोशा, शिवालिक स्काईस, डिवाईन सॉलिटेअर आणि बिकवर्क या अश्वांनी जगाचाच निरोप घेतला. अश्वांचे रायडर्स आणि पथकाच्या प्रमुखांनी त्या अश्वांचे प्राण वाचावे यासाठी त्यांच्या परीने शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही असे एका अधिकाऱयाने सांगितले, तर हिंदुस्थानी जातीच्या एका अश्वाला आजारपणामुळे पथकातून काढण्याची नामुष्कीदेखील ओढावल्याचे ते म्हणाले. परिणामी सद्यस्थितीत माऊंटेड पथकात तीन अरेबियन आणि पाच हिंदुस्थानी असे आठ अश्व शिल्लक राहिले आहेत.
30 अश्व पथकात येणार होते, पण…
माऊंटेड पथकात एकूण 30 अश्व घेण्यात येणार होते. त्यानुसार सुरुवातीला 13 अश्व पथकात दाखल झाले. त्यानंतर सहा महिन्यांनी उर्वरित अश्व दाखल होणार होते, परंतु बाकीचे 17 अश्व अद्याप पथकात आलेले नाहीच, उलट पाच अश्व कमी झालेत.
‘कोलिक’चा धोका
रवंथ करणाऱया प्राण्यांचे चार कप्प्यांचे पोट असते, तर रवंथ न करणाऱया प्राण्यांचे एका कप्प्याचे पोट असते. अश्वांना योग्य आहार, निगा व शारीरिक सराव नियोजन पद्धतीने असणे अत्यंत गरजेचे असते. एक कप्पा पोट असल्याने अश्वांना ‘कोलिक’ हा गंभीर आजार पटकन होतो. अश्वांमध्ये हा तसा सर्वसाधारण आजार आहे. वेळीच त्याचे निदान झाले आणि त्यावर उपचार झाले तर धोका टळतो, पण कोलिक झाल्याचे समजण्यास जरा जरी वेळ लागला की तो आजार अश्वांच्या जिवावर बेततो, असे एका पशुवैद्यकीय अधिकाऱयाने सांगितले. त्यामळे रायडर्स व अधिकाऱयांना अश्वांची काळजी घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
माऊंटेड पथकात असलेल्या अश्वांचा आमचा स्टाफ आणि वैद्यकीय अधिकारी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात. त्यांना वेळच्या वेळी आहार दिला जातो. अश्व पाणी किती पितात, खातात की नाही याची बारकाईने पाहणी केली जाते. अश्वांच्या दैनंदिन प्रकृतीत बिघाड वाटला की आवश्यक ते औषधोपचारदेखील केले जातात.
– डॉ. खामकर, माऊंटेड पथक




























































