वीजनिर्मितीसाठी महानिर्मितीला मुबलक कोळसा मिळणार, गरेपालमा कोळसा खाण विकसित करण्यासाठी अदानीसोबत करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील प्रमुख वीज निर्मिती कंपनी असलेल्या महानिर्मितीला आता मुबलक कोळसा मिळणार आहे. केंद्र सरकारने महानिर्मितीला दिलेली छत्तीसगडमधील गरेमालमा-2 ही कोळसा खाण विकसित करून त्यामधून प्रत्यक्ष कोळशाचे उत्खनन करण्यासाठी महानिर्मितीने अदानी एन्टरप्रायझेससोबत करार केला आहे. त्यामुळे सदर खाणीतून प्रत्यक्ष कोळशाचे उत्खनन सुरू झाल्यानंतर वर्षाला तब्बल 23 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा मिळणार आहे. त्यामुळे महानिर्मितीवरील कोळसा टंचाईचे संकट दूर होणार आहे.

महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांची स्थापित क्षमता सुमारे साडेआठ हजार मेगावॅट असून सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी दिवसाला जवळपास एक लाख मेट्रिक टन कोळशाची गरज आहे. मात्र गरजेच्या तुलनेत कोल इंडियाकडून केवळ 70-80 टक्के कोळसा उपलब्ध होतो. त्यामुळे वीज निर्मिती करताना मर्यादा येतात. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2015 मध्ये केंद्रीय कोळसा मंत्रालयाने महानिर्मितीला छत्तीसगड राज्यातील रायगड जिल्ह्यात तब्बल 2600 हेक्टर क्षेत्र असलेली गरेपालमा-2 ही कोळसा खाण दिली आहे. येथे 553 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा येथे असून वर्षाला 23.6 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा उपलब्ध होणार आहे.

कोराडी, चंद्रपूर, परळी वीज केंद्राला कोळशाचा पुरवठा

छत्तीसगडमधील गरेपालमा कोळसा खाणीतून उपलब्ध होणारा कोळसा कोराडी, चंद्रपूर आणि परळी औष्णिक वीज केंद्रांना पुरवण्याबाबत महानिर्मितीचे नियोजन आहे. कोल इंडियाकडून खरेदी करण्यात येणाऱया कोळशाच्या किंमतीचा विचार करता गरेपालमाच्या खाणीतून कमी खर्चात कोळसा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या वीज निर्मिती खर्चातही कपात होऊ शकणार आहे.