
कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने यंदा धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत मुंबईकरांनी सोने-चांदी खरेदीसाठी शहरातील सराफा बाजारात अक्षरशः गर्दी केली होती. एकटय़ा मुंबईतील सराफा बाजारात मंगळवारी दिवसभरात साधारण 600 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने वर्तवला आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा फटका सर्वच सण-उत्सवांना बसला. कोरोनाची साथ आता आटोक्यात येताच बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे दसऱयापाठोपाठ धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत सोने-चांदी खरेदीसाठी मुंबईकरांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. गुंतवणूक म्हणून सोन्याची नाणी, बिस्किटांच्या खरेदीलाही मुंबईकरांनी पसंती मिळाली. मंगळवारी सोन्याचे दर प्रतितोळा 49,400 रुपये तर चांदीचे दर 70 हजार रुपये किलोवर पोहोचले होते. याबाबत इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष कुमार जैन म्हणाले, कोरोनाच्या भीतीमुळे गेल्या दिवाळीला सोने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये फारसा उत्साह दिसत नव्हता. आता राज्यात कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात आहे, बहुतेक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली. मुंबईतील सराफा बाजारात दिवसभरात साधारण 600 कोटी रुपयांची तर राज्यात 800 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. पुढे ते म्हणाले, कोरोनाकाळात सोन्याचे दर प्रतितोळा 58 हजार रुपयांवर पोहोचले होते, आता सोन्याचे दर 47 हजार ते 49, 500 दरम्यान आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे.




























































