गुंतवणूक क्षेत्रात व्यवसायाची सुवर्णसंधी

>>चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

आपल्याकडे जर वेळेचे अन् बुद्धीचे भांडवल असेल तर गुंतवणूक क्षेत्रात व्यवसायाची सुवर्णसंधी आहे.

गरज आर्थिक सल्लागारांची…

म्युच्युअल फंड इंडस्ट्री 2013 ला रुपये 7.46 ट्रिलियनपासून 2022 पर्यंत रुपये 46.58 ट्रिलियन एवढी सहा पटपर्यंत वाढली ती आता डॉलर 100 बिलियनपासून 2026 पर्यंत डॉलर 222 बिलियनपर्यंत वाढणार आहे. सध्या 160000 करोड महिन्याचे एसआयपी बुक झाले आहेत आणि आजच्या घडीला गंमत म्हणजे फक्त 3.5 करोड एवढेच गुंतवणूकदार झाले आहेत. म्हणजे 139 करोड जनतेसाठी किती व्यावसायिकांना संधी आहे हा विचार करणे गरजेचे आहे.

कुठल्याही क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे आणि जिद्दीने काम करायचे ठरवले तर आपण त्या क्षेत्रात उंचीवर जाऊ शकतो. नोकरीत कितीही काम केले तरीही एका प्रमाणाबाहेर आपला विकास होत नाही, पण व्यवसाय अशी गोष्ट आहे ज्यात आपण जेवढे काम वाढवू तेवढा आपला नफा वाढविण्याची संधी असते. पण व्यवसाय म्हटला की, भांडवल आले आणि बऱयाच जणांची येथेच पंचाईत होते. काही व्यवसाय असे असतात की, ज्यामध्ये भांडवल लागणारच आहे. पण काही व्यवसाय असेही असतात की, ज्यामध्ये सुरू करताना भांडवलाची गरज नाही. मग असा कुठला व्यवसाय आहे ज्यामध्ये भांडवल लागणार नाही. शिवाय उत्पन्न मिळविण्यासाठी जो कच्चा माल लागणार आहे तोही सर्वत्र फुकट उपलब्ध आहे? ओळखा पाहू?

असो. हा व्यवसाय म्हणजे आर्थिक सल्लागार व वितरक होणे. यामध्ये आपण आयआरडीची परीक्षा देऊन जीवन व इतर विमा पंपनीचे अभिकर्ता होऊ शकता. अँफीची परीक्षा देऊन म्युच्युअल फंड वितरकदेखील होऊ शकता. ग्राहकांना योग्य सल्ला देऊन त्यांना आपल्याकडे असलेली गुंतवणुकीची साधने योग्य प्रमाणात देऊन ग्राहकांना सुरक्षित करून त्याची संपत्ती निर्माण करू शकता. अशा प्रकारे व्यवसाय करून अनेकांनी स्वतःचे करीअर केलेच, पण अनेकांना स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी नोकऱयाही उपलब्ध करून दिल्या. या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवले. ज्या व्यवसायाला पूर्वी कमी लेखले जायचे, त्या व्यवसायाला आपला प्रोफेशनल टच देऊन मानाचे स्थान निर्माण केले.

जो व्यवसाय आपण करणार आहोत त्याचे भविष्य काय हे जाणणेदेखील खूप आवश्यक असते. मी ज्या कच्च्या मालाचा उल्लेख केला ते म्हणजे लोकसंख्या. आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात 1 नंबर आहे. आजच्या घडीला हिंदुस्थानात 139 करोड लोकसंख्या आहे. त्यामुळे या व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार आहे. आपल्या देशात आजच्या घडीला फक्त 3.5 करोड लोकसंख्या फक्त विमाधारक आहेत. म्हणजे विचार करा नवीन व्यवसायात येणाऱया व्यक्तीला किती संधी आहे, याचा विचार करा.

येणाऱया 25 वर्षांत तंत्रज्ञानाने केलेल्या प्रचंड प्रगतीने अनेकांकडे पोहोचणे अगदी सोपे होणार आहे. गुंतवणूक क्षेत्राला कधीच ग्राहकांची कमी पडणार नाही. गुंतवणुकीची गरज कधीही न मिटणारी आहे. हीच वेळ आहे संधीचा वेध घेण्याची. नोकरी मिळत नाही म्हणून हताश होऊन बसण्यापेक्षा गुंतवणुकीचा व्यवसाय आपल्या आयुष्यात एक नवी दिशा देऊ शकतो. या क्षेत्रात येऊन आपण इतरांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ शकता व देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकता.

[email protected]