
कोरोनाच्या महामारीमुळे सलग दुसऱया वर्षी गुढीपाडवा साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. मिरवणुका, चित्ररथ, बाईक रॅली ही सणाची शान यंदा अनुभवता येणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून यंदा गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा असे निर्देश दिले आहेत.
कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सणांवरही निर्बंध आले आहेत. यामुळे मंगळवारी होणार गुढीपाडवा सणावरदेखील कोरोनाचे सावट असून सरकारकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. नियमावलीनुसार, सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी असणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
































































