चित्ररथांच्या स्पर्धेत गुजरातचा चित्ररथ प्रथम; पीपल्स चॉईस विभागात पहिली पसंती; परीक्षक विभागात द्वितीय

प्रजासत्ताक दिनी राजधानीत झालेल्या दिमाखदार संचलनातील सहभागी चित्ररथांपैकी गुजरातचा चित्ररथ लोकांची सर्वाधिक पसंती मिळवून पीपल्स चॉईस विभागात प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. ओडिशाच्या चित्ररथाला परीक्षकांची निवड विभागात प्रथम पुरस्कार मिळाला असून गुजरातच्याच चित्ररथाला परीक्षकांनी या विभागात द्वितीय पुरस्कार दिला आहे.

सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘भारतः लोकशाहीची माता’ या थीमवरील चित्ररथाला विविध मंत्रालये आणि विभागांनी सादर केलेल्या चित्ररथांमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. एकूण 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ तसेच सरकारी खाती आणि विभागांनी 9 चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, हरियाणा, मणिपूर, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, लडाख, तामिळनाडू, गुजरात, मेघालय, झारखंड, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा यांचा समावेश होता. परिक्षक विभागात तामिळनाडूच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला. पीपल्स चॉईस विभागात उत्तर प्रदेशने दुसरे तर आंध्र प्रदेशने तिसरे स्थान पटकावले आहे.

 ओदिशा, गुजरातचे चित्ररथ चमकले

ओदिशाच्या चित्ररथावर राज्यातील महिला सक्षमीकरण तसेच तेथील समृद्ध हस्तकला आणि हातमाग क्षेत्राचे दर्शन घडवण्यात आले होते. विविध योजनांना पाठबळ देणाऱ्या केंद्र सरकारचे योगदान या चित्ररथावर अधोरेखित करण्यात आले होते. गुजरातने कच्छच्या धोर्डो पर्यटन खेडय़ाची झलक दाखवताना या चित्ररथावर कच्छच्या कला आणि संस्कृतीचेही प्रदर्शन घडवले होते. आज जाहीर झालेले हे पुरस्कार दिल्ली कँटोनमेन्ट येथे समारंभात प्रदान करण्यात आले.