दीप्ती लेले – प्रॉमिसिंग आर्किटेक्ट ते अभिनेत्री

सध्या ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. या नाटकात ‘निधी’ ही भूमिका साकारतेय दीप्ती लेले ही अभिनेत्री….एक प्रॉमिसिंग चेहरा

दीप्तीचे शिक्षण पुण्यातून झाले. तिने बीएनसीए कॉलेजमधून आर्किटेक्चरचे प्रशिक्षण पूर्ण केले. नंतर ती नोकरीही करत होती. त्यावेळी प्रशांत दामले यांच्या ट्रेनिंग स्कूलची जाहिरात पाहून तिने त्यात प्रवेश घेतला आणि त्यानंतर अनिरुद्ध खुटवड यांची एक कार्यशाळादेखील केली. पुण्यात सुदर्शन रंगमंच इथे प्रायोगिक नाटके ती पाहत होती आणि त्यातून तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. या क्षेत्राचा विचार आपण करीअर म्हणून करू शकतो, असा विचार तिच्या मनात आला.

झी मराठीवरील ‘तुझं माझं जमेना’ मालिकेतील एका व्यक्तिरेखेकरिता दीप्तीची निवड झाली. त्यानंतर लगोरी, सांग तू आहेस का, ती फुलराणी अशा मालिकांत तिने काम केलं. सायकल, मी शिवाजी पार्क, पांघरुण या चित्रपटांतदेखील तिच्या भूमिका होत्या. दीप्तीने ‘चॅलेंज’ या नाटकात काम केलं होतं. ‘ती फुलराणी’ मालिका संपल्यावर एखादे चांगले नाटक मिळावे, अशी तिची इच्छा होती आणि ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ यातील भूमिका तिला मिळाली.

दीप्ती म्हणते, हे नाटक माझ्या आयुष्यातील टार्ंनग पॉइंट म्हटले पाहिजे. यातील ‘निधी’ ही वीस-एकवीस वर्षांची मुलगी आहे. ती एखाद्या गोष्टीला पटकन रिऍक्ट होणारी आहे, प्रसंगी चिडणारीदेखील आहे, पण ती विचाराने प्रगल्भदेखील आहे. एकाच वेळी अनेक शेड्स या भूमिकेला आहेत. नाटक हे दीप्तीचे आवडते माध्यम आहे. ती म्हणते, नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा वेगळा अनुभव देणारा असतो. प्रत्येक प्रयोगागणिक आपण अधिक शिकतो.

दीप्तीला ट्रेकिंग, शेअर मार्केट, ज्योतिषशास्त्र अशा गोष्टींचीदेखील आवड आहे. शिवाय सध्या ती तिच्या वडिलांबरोबर प्रॉपर्टी व्हॅल्युएशनची कामेदेखील करत आहे. विविध माध्यमांत काम करून स्वतःची एक वेगळी ओळख दीप्तीने निर्माण केली आहे.

>> गणेश आचवल