परीक्षा रद्द करण्यासंदर्भात कुलगुरूंकडे दाद मागा!हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया तृतीय वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. मुंबई विद्यापीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असे स्पष्ट करत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी या प्रकरणी कुलगुरूंकडे दाद मागा अशा सूचना विद्यार्थ्यांना केल्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 1 ते 17 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षा रद्द करण्याची मागणी करत अंतिम वर्षाच्या दोघा विद्यार्थ्यांनी ऍड. शरोन पाटोळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी मुंबई युनिव्हर्सिटीच्या वतीने ऍड रुई रॉड्रीक्स यांनी बाजू मांडत कोर्टाला सांगितले की ही परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन (एमसीक्यू) पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यावर याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले की विद्यार्थ्यांना एमसीक्यू फॉरमॅट नवीन आहे. तसेच विद्यापीठाने स्वतŠच्या परिपत्रकाचे उल्लंघन केले असून या परिपत्रकानुसार कॉलेजांनी किमान एक महिन्यापूर्वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे गरजेचे आहे. तसे न करता विद्यापीठाने घाईघाईत परीक्षेचा निर्णय घेतला. त्यावर खंडपीठाने विद्यार्थ्यांची मागणी फेटाळून लावली.

योग्य ती खबरदारी
कोविडचे नियम पाळूनच ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार असून परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मुंबई किद्यापीठाचे ऍड. रुई रॉड्रीक्स यांनी खंडपीठाला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या