काँग्रेसला दिलासा, निवडणुका होईपर्यंत आयकर कारवाई नाही; केंद्राची सुप्रीम कोर्टात हमी

लोकसभा निवडणुका संपेपर्यंत काँग्रेसकडून सुमारे 3 हजार 500 कोटींची कथित आयकर थकबाकी वसूल करण्यासाठी कोणतीही पावले उचलणार नाहीत, असे आश्वासन आयकर विभागाने आज सर्वोच्च न्यायालयात दिले. आयकर खात्याने कथित थकबाकीसाठी नोटिसींचा ससेमिरा काँग्रेसच्या पाठीमागे लावून खाती गोठवल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱया काँग्रेसला थोडा दिलासा मिळाला.

आयकर खात्याला हाताशी धरून देशातील सर्वात मोठय़ा विरोधी पक्षाची ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी नाकाबंदी करण्याची हीन खेळी खेळल्याबद्दल काँग्रेससह विरोधी पक्षांची इंडिया आघाडी आणि लोकांकडूनही भाजप आणि केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार सध्या सुरू आहे. काँग्रेसनेही या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेत निवडणुकांपर्यंत पुढील कारवाई करणार नाही, असे सुप्रीम कोर्टात सांगितले.

हिंदुस्थानचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर हे हमीपत्र दिले. केंद्राचे हे आश्वासन नोंदवून घेत, कोर्टाने पुढील सुनावणी जुलैच्या दुसऱया आठवडय़ात होईल, असे निर्देश दिले.

काँग्रेसचे वकीलही झाले आश्चर्यचकीत

जेव्हा न्यायालयाने विचारले की, केंद्र कर मागणीला विराम देत आहे का, तेव्हा ‘नाही, आम्ही फक्त असे म्हणत आहोत की निवडणुकीपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही’, असे उत्तर आयकर विभागाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिल्यावर काँग्रेसचे वकील अॅड. अभिषेक सिंघवी हेही आश्चर्यचकीत झाले. यावर काय बोलावे हेच कळत नाही, मी निःशब्द झालो आहे आणि मी खूप कमी वेळा असा निःशब्द होतो, असे त्यांनी बोलूनही दाखवले.

भाजपवर कर दहशतवादाचा आरोप

आयकर विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी पाठवण्यात आलेल्या नोटिसांविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सत्ताधारी भाजपचा हा ‘कर दहशतवाद’ असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच निवडणुकीत समान संधी देण्याच्या तत्त्वाला यामुळे हरताळ फासला गेला असून निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करण्याची विनंतीही काँग्रेसने केली होती. आयकर अधिकाऱयांनी मागील वर्षांच्या देय रकमेसाठी पक्षाच्या खात्यातून 135 कोटी आधीच काढले आहेत.

आयकर नोटिसा ही पूर्वग्रहदूषित कृती – प्रियंका गांधी

140 कोटी हिंदुस्थानींचा आवाज दाबण्यासाठी आयकर खात्याकडून नोटिसांची पूर्वग्रहदूषित कृती करण्यात आल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज केली. भाजपची ही लोकशाहीविरोधी खेळी लोक कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, असे त्यांनी एक्सवर केलेल्या हिंदी पोस्टमध्ये ठामपणे म्हटले आहे. काँग्रेसला लावलेला कायदा भाजपलाही लावा, अशी मागणी त्यांनी केली.