हुकूमशाही हटवणार! लोकशाही वाचवणार!! मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ; महासभेला लोटला विराट जनसागर

देशभक्त पक्षांच्या इंडिया आघाडीने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध आवळलेली वज्रमूठ आणखी घट्ट केली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीची ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’ आज झाली. रामलीला मैदानावर आयोजित या महारॅलीला देशभरातून विराट जनसागर लोटला होता. या ऐतिहासिक मैदानावरून इंडियाने हुकूमशाहीच्या रावणाचे दहन करून देशातील लोकशाही वाचवणारच असा एकमुखी निर्धार केला. सत्ता कायम राहत नाही आणि अहंकाराचा नाश होतो अशा प्रभू श्रीरामांच्या संदेशाचीही आघाडीच्या नेत्यांनी यावेळी सत्ताधाऱयांना आठवण करून दिली.

इंडिया आघाडीच्या महारॅलीला उत्तर हिंदुस्थानसह देशभरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, वयोवृद्ध, शिक्षक अशा समाजातील सर्वच घटकांचा त्यात समावेश होता. मोदी सरकार आणि भाजपवर या सभेतून इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार हल्ला चढवला. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. काहीही झाले तरी झुकणार नाही, लढणार आणि जिंकणारच असा निर्धारच यावेळी करण्यात आला.

या वेळी सभास्थानी काँगेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँगेस नेत्या सोनिया गांधी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, द्रमुकचे तिरुची शिवा, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, तृणमूल काँगेसचे डेरेक ओ’ब्रायन, माकपाचे सीताराम येचुरी, भाकपाचे डी. राजा, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, महारॅलीचे संयोजक व दिल्लीचे मंत्री गोपाल राय, अतिशी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

भाजप-आरएसएस विषासमान – खरगे

नरेंद्र मोदी यांचा लोकशाहावर नाही हुकूमशाहीवर विश्वास आहे. भाजप आणि आरएसएस विषासमान आहे. जर हे विष तुम्ही चाटाल तर तुम्ही मराल आणि प्याल तरीही मराल, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. पुढे खरगे म्हणाले, काल राष्ट्रपती भवनात मोदी भेटले होते. यावेळी निवडणुकीवर चर्चा झाली. निवडणुकीबद्दल त्यांनी मला विचारले असता मी म्हणालो, जे सुरू आहे ते निष्पक्ष नाही. आमच्या पक्षाच्या खात्यातील पैसे आधीच चोरी झालेत. दरम्यान, काँग्रेसला 3 हजार 567 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 14 लाख रुपयांचा हिशोब दिला नाही म्हणून 135 कोटींचा दंड ठोठावला. आता हा दंड वाढून 3 हजार 567 कोटींवर गेल्याकडे खरगे यांनी लक्ष वेधले.

रावणाकडे सर्व होते, पण प्रभू रामाकडे सत्य होते- प्रियंका गांधी

भगवान राम सत्यासाठी युद्ध करत होते. त्यांच्याकडे शक्ती, शस्त्रास्त्रs किंवा रथही नव्हता. रावणाकडे रथ, शस्त्रास्त्रs सैन्य आणि सोनेही होते. पण, प्रभू रामाकडे सत्य, आशा, विश्वास, धैर्य आणि साहस होते, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला हजारो वर्षांपूर्वीच्या सत्य-असत्याच्या लढाईचा दाखला दिला. दिल्लीतल्या या प्रसिद्ध मैदानात मी लहानपणापासून येतेय. तेव्हा रावण दहन बघायला येत होते. आज सत्तेत आहेत ते स्वतŠला रामभक्त म्हणवतात, पण मला वाटते कर्मकांड आणि दिखावा करण्यात दंग आहेत. त्यामुळे मी त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की, राम जेव्हा लढले तेव्हा त्यांच्याकडे काही नव्हते. रावणाकडे सर्व होते, पण रामाकडे सत्य होते असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

केजरीवाल यांचा तुरुंगातून संदेश

अरविंद केजरीवाल यांनी देशवासियांना तुरुंगातून दिलेला संदेश सुनिता केजरीवाल यांनी वाचून दाखवला. त्या म्हणाल्या, तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो. मी आज तुम्हाला मलाच मतदान करा असे सांगत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कोणाला पराभूत करण्यासाठी किंवा विजयी करण्यासाठी आवाहनही करत नाही. मी 140 कोटी देशवासियांना देशाला सहयोग करण्याचे आवाहन करत आहे. नवा भारत बनवण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहे. भारत महान देश आहे. आपली संस्कृती खूप जुनी आहे. तरीही आपल्या देशात अशिक्षित का आहेत, गरीब का आहेत? असा सवाल केजरीवाल यांनी संदेशाद्वारे केला. भारत माता ही दुŠखात आहे. आज भारत माता अगतिक अवस्थेत आहे, असेही त्यांनी संदेशात म्हटल्याचे सुनीता केजरीवाल यांनी वाचून दाखवले.

हुकूमशाही संपेल – कल्पना सोरेन

देशात हुकूमशाही सुरू आहे. ही हुकुमशाही लवकरच संपेल, असा विश्वास झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी व्यक्त केला. देशात 50 टक्के महिला आणि 9 टक्के आदिवासींचा आवाज बनून मी आज तुमच्यासमोर उभी आहे. या मैदानात मोदींच्या हुकूमशाहीविरोधात देशाच्या प्रत्येक भागातून तुम्ही या ऐतिहासिक मैदानात आला आहात. ही सभाच त्याबद्दलचा पुरावा आहे, असेही कल्पना सोरेन म्हणाल्या. जनता आता गप्प बसणार नाही लोकशाही वाचवण्यासाठी भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीचे प्रतीक असणारे सरकार हटवण्यासाठी पूर्ण तयारीनिशी उभी आहे, असेही त्या म्हणाल्या.

गाण्यातून कडाडले तेजस्वी यादव

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बॉलीवूडमधील गाण्याच्या चालीवर मोदींवर जोरदार प्रहार केला. तुम तो मोदीजी धोकेबाज हो… वादा कर के भूल जाते हो… रोज-रोज मोदी जी तुम जो ऐसा करोगे… लजनता जो रुठ गई तो हाथ मलोगे… अशा गाण्याने तेजस्वी यांनी भाषणाची सुरुवात केली. पुढे ते म्हणाले, या लढाईत आम्हाला तुमची साथ हवी आहे, असे आवाहन तेजस्वी यादव यांनी केले. यावेळी 400 पार असे ते बोलत आहेत. त्यांचे तोंड आहे, काहीही बोलतील. पण, एक गोष्ट खरी आहे, जनताही मालिक आहे, असेही तेजस्वी यादव म्हणाले.

सत्ताधाऱयांची दहशत थांबवा, इंडिया आघाडीच्या निवडणूक आयोगाकडे पाच मागण्या

लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात व्हावी यासाठी इंडिया आघाडीने या रॅलीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे पाच मागण्या केल्या.

लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलावीत.
निवडणुकीत हेराफेरी करण्याच्या उद्देशाने विरोधी पक्षांविरोधात तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जात आहे तो थांबवावा.
हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची कोठडीतून तत्काळ सुटका करण्यात यावी.
विरोधी पक्षांचा आर्थिकदृष्टय़ा गळा घोटला जात आहे, आकसाने कारवाई केली जात आहे ती थांबवावी.
निवडणूक रोख्यांतून मिळालेल्या पैशांतून भाजप दहशत माजवत आहे त्याची सर्वेच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी नेमून चौकशी करावी.