
‘टीम इंडिया’ने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पराभवाची जळमटे सारून अखेर दिवाळीपूर्वीच धावांची फटकेबाजी केली. लागोपाठच्या दोन पराभवानंतर विराट सेनेने अफगाणिस्तानचा 66 धावांनी धुव्वा उडवून खऱया अर्थाने जर-तरच्या समीकरणाची वात पेटवली. मात्र, उपांत्य फेरीतील आशांचा दीप तेवत ठेवण्यासाठी हिंदुस्थानी संघाला इतर लढतींच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. रोहित शर्मा या सामन्याचा मानकरी ठरला.
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 7 बाद 144 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 14 धावांत 2 बळी टिपले. अफगाणिस्तानची आघाडीची फळी तंबू पाठविण्यात हिंदुस्थानी गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र, कर्णधार मोहम्मद नबी (35) व करीम जनात (नाबाद 42) यांनी चांगली फटकेबाजी केली.
रोहित-राहुलची खणखणीत सलामी
दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी 14.4 षटकांत 140 धावांची खणखणी सलामी दिली. रोहितने 47 चेंडूंत 74 धावांची खेळी करताना 8 सणसणीत चौकारांसह 3 उतुंग षटकार ठोकले. राहुलने 48 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 69 धावांची खेळी केली. करीम जनातने रोहितला मोहम्मद नबीकरवी झेलबाद करुन ही जोडी फोडली.
आजच्या लढती
ऑस्ट्रेलिया वि. बांगला देश
गट 1 – दुबई,
दुपारी 3ः30 वाजता
श्रीलंका वि. वेस्ट इंडीज
गट 1 – अबुधाबी,
रात्री 7ः30 वाजता




























































