
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने तिसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा 73 धावांनी धुव्वा उडविला. या विजयासह हिंदुस्थानने मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादन केले. रोहित शर्माचे अर्धशतक, दीपक चहरची अष्टपैलू कामगिरी अन् अक्षर पटेलची अफलातून गोलंदाजी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात हिंदुस्थानने न्यूझीलंडवर पहिल्यांदाच निर्भेळ यश मिळविले, हे विशेष.
गप्टीलची एकाकी झुंज
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 17.2 षटकांत 111 धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर मार्टीन गप्टीलने एकाकी झुंज देताना 36 चेंडूंत 4 षटकार व तितक्याच चौकारांची आतषबाजी केली. गप्टील वगळता टीम सेईफर्ड (17) व लॉकी फर्ग्युसन (14) यांनाच केवळ दुहेरी धावा करता आल्या. हिंदुस्थानकडून अक्षर पटेलने 3, तर हर्षल पटेलने 2 गडी बाद केले. दीपक चहर, युझवेंद्र चहल व व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
चहरने केला कहर
अय्यर बंधू बाद झाल्यानंतर हर्षल पटेल (18) व दीपक चहर (नाबाद 21) यांनी हाणामारी केली म्हणून हिंदुस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारला आली. हर्षलने 11 चेंडूंत 2 चौकार व एक षटकार लगावला. चहरने अॅडम मिल्नेच्या अखेरच्या षटकांत 2 चौकार एका षटकारासह 19 धावांची लयलूट केली. त्याने केवळ 8 चेंडूंत नाबाद 21 धावांची वादळी खेळी केली. न्यूझीलंडकडून सॅण्टनरने 3, तर ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन व इश सोधी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
उभय संघांतील बदल
तीन सामन्यांची मालिका आधीच 2-0ने जिंकून निश्चिंत झालेल्या कर्णधार रोहित शर्माने बाकावरील खेळाडूंना संधी दिली. सलामीवीर लोकेश राहुल व रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देऊन इशान किशन व युझवेंद्र चहल यांना संधी दिली. लढतीचा ‘सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून अक्षर पटेलला तर मालिकेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून कर्णधार रोहित शर्माला सन्मानित करण्यात आले.
रोहितचे सलग दुसरे अर्धशतक
त्याआधी नाणेफेकीचा काwल जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 184 धावसंख्या उभारली. कर्णधार रोहित शर्माने सलग दुसऱया लढतीत अर्धशतक झळकावून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. रोहित (56) व इशान किशन (29) यांनी 6.2 षटकांत 69 धावांनी खणखणीत सलामी दिली. डावखुरा फिरकीपटू मिशेल सॅण्टनरने सातव्या षटकात किशनला यष्टीमागे सेईफर्डकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. त्यानंतर सॅण्टनरने सूर्यकुमार यादव (0) व रिषभ पंत (4) यांनाही लागोपाठच्या षटकात आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून हिंदुस्थानची 9 षटकांत 3 बाद 83 अशी अवस्था केली. मात्र रोहितने तोपर्यंत दुसऱया बाजूने 31 चेंडूंत 56 धावा करताना 5 सणसणीत चौकार व 3 टोलेजंग षटकार ठोकून धावगती 10च्या खाली येणार नाही याची काळजी घेतली. इश सोधीने स्वतःच्या गोलंदाजीवर अफलातून झेल टिपत रोहितला तंबूत पाठविले. त्यानंतर श्रेयस अय्यर (25) व व्यंकटेश अय्यर (20) या मधल्या फळीतील फलंदाजांनी धावफलक हलता ठेवला.




























































