
हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळामध्ये गलवान खोऱ्याचा बहुतांश भाग चीनकडे सोपवण्यात आला होता. तेव्हापासून सीमारेषा ‘जैसे थे’ असून त्यानंतरच्या वर्षांमध्ये एकही इंचही जमीन चीनकडे गेलेली नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावरील चर्चेदरम्यान त्यांनी लोकसभेत बोलताना हा दावा केला.
1962 ते 2019 पर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने आपल्या निवडणूक घोषणापत्रांमध्ये अक्साई चीनचा भूभाग हिंदुस्थानमध्ये पुन्हा समाविष्ट केला जाईल असे का कधीच म्हटले नाही, असा सवाल खासदार जामयांग नामग्याल यांनी केला. तसेच 2022-23 साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प ऐतिहासिक असून यात सीमाजवळील भागांचा विकास करण्यावर जोर दिल्याचेही ते म्हणाले.
‘मी सीमावर्ती भाग, लडाखमधून येतो आणि हा भाग तिबेट, चीन आणि पाकिस्तान या तीन देशांच्या सीमारेषेवर आहे. या भागात नेहमीच तणाव राहिलायस असे म्हणत नामग्याल यांनी सीमावर्ती भागासाठी तुम्ही काय केले? असा सवालही केला. काँग्रेसने या भागाचा काहीही विकास केला नाही आणि लोकांना जीवनावश्यक सुविधाही कधी पुरवल्या नाहीत’, असा आरोप त्यांनी केला.
‘नेहरुंनी देशात ‘फॉरवर्ड’, तर सीमारेषांवर ‘बॅकवर्ड’ नीती वापरली. त्यामुळे सीमाभाग निर्जन झाला, लोकांना सुखसुविधाही मिळाल्या नाहीत. आज त्याच पक्षाचे नेते सरकारला गलवान काय आहे? पॅन्गॉन्ग आणि चुशूलवर काय सुरूय? असा लाजिरवाणा सवाल करत आहेत’, असेही नामग्याल म्हणाले. ‘एकीकडे हिंदुस्थानचा सीमावर्ती भागात विकास झाला नाही तर दुसरीकडे चीनने केलेल्या विकासकामांची यादीच नामग्याल यांनी वाचत काँग्रेसचे वाभाडे काढले. चीनने येथे धरण उभारले, 6-7 विमानतळे उभी केली, असेही नामग्याल म्हणाले.
View this post on Instagram
एक इंचही जमीन गमावली नाही
ते पुढे म्हणाले की, ‘गलवान खोरे खूप मोठे आहे. नेहरुंच्या काळात गलवान खोऱ्याचा बहुतांश भाग चीनकडे सोपवण्यात आला होता. आपल्याकडे जे उरले आहे तो भाग फक्त पीपी-14 आहे, जो गलवानचा प्रवेशबिंदू आहे. पीपी-14 आणि गलवान खोरे वारंवार चर्चेत येत असल्याने मी सांगू इच्छितो की तेव्हा जिथे होतो तिथेच आताही आहोत. एक इंचही क्षेत्र आपण गमावलेले नाही.’



























































