पाकिस्तानचा क्रिकेट संघ हिंदुस्थानमध्ये येणार, मोदी सरकारने दाखवला हिरवा कंदील

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup)मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला हिंदुस्थान सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मोदी सरकार पाकिस्तानी खेळाडू आणि प्रसारमाध्यमांना व्हिसा देण्यासाठी तयार असून यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) देखील मोकळा श्वास घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या व्हर्चुअल बैठकीमध्ये बीसीसीआयने याबाबत माहिती दिली.

बैठकीमध्ये सहभागी झालेल्या बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, टी-20 वर्ल्डकप आयसीसीची स्पर्धा आहे. त्यामुळे सरकारने पाकिस्तान खेळाडू आणि प्रसारमाध्यमांना हिंदुस्थानमध्ये येण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. मात्र चाहत्यांबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आगामी काळात याबाबत चर्चा होऊन संबंधित मंत्रालय याबाबत निर्णय घेईल, असेही बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष एहसान मनी यांनी बीसीसाआयने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्याबाबत 31 मार्चपर्यंत आपले म्हणणे स्पष्ट करण्यास सांगितले होते. यानंतर 1 एप्रिलला झालेल्या आयसीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये हा वाद आगामी एक महिन्यात सोडवण्यात यावा असा निर्णय झाला होता. आता महिन्याभरातच हिंदुस्थानने याबाबत निर्णय घेत पाकिस्तान खेळाडूंना व्हिसा देण्यास सहमती दर्शवली आहे.

स्पर्धेची तयारी सुरू

आयसीसीच्या बैठकीमध्ये बीसीसीआयने या स्पर्धेची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. स्पर्धेसाठी 9 शहरं तयार असल्याचे बीसीसाआयने सांगितले. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद येथे होईल, तसेच दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, धर्मशाळा, कोलकाता आणि लखनौची मैदाने देखील आयोजनासाठी सज्ज आहेत. तसेच याबाबत अंतिम निर्णय स्पर्धा जवळ आल्यानंतर घेण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या