IPL 2024 : मुंबईची पराभवाची मालिका कायम, लखनऊचा 4 विकेटने विजय

आयपीएलच्या सतराव्या हंगामात एकिकडे दुसरे संघ धावांचा पाऊस पाडत आहे. तर दुसरिकडे मुंबईच्या फलंदाजांना अजूनही सूर गवसलेला नाही. घरच्या मैदनावर खेळताना लखनऊच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत मुंबईच्या संपूर्ण संघाला 144 या धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवले. लक्षाचा पाठलाग करताना मार्क स्टॉईनिसने (45 चेंडू 62) केलेल्या धुवाँधार फलंदाजीमुळे लखनऊने 4 विकेटने विजय संपादित केला.

नाणेफेक जिंकून लखनऊने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाल के एल राहूलने घेतलेल्या निर्णयाचा मान ठेवत लखनऊच्या गोलंदाजांनी तिखट मारा केला. रोहित शर्मा (5 चेंडू 4 धावा), सूर्यकुमार यादव (6 चेंडू 10 धावा), तिलक वर्मा (11 चेंडू 7 धावा) यांना झटपट बाद करण्यात लखनऊच्या गोलंदाजांना यश आले. कर्णधार हार्दिक पंड्या भोपळा सुद्धा फोडू शकला नाही. इशान (36 चेंडू 32 धावा), नेहाल वाधेरा (41 चेंडू 46 धावा) टीम डेवीड (18 चेंडू 35 धावा) यांनी संयमी खेळी केल्यामुळे मुंबईला 144 या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. लखनऊकडून मोहसीन खानला दोन विकेट मिळवण्यात यश आले. तर इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊला अर्शिन कुलकर्णीच्या स्वरुपात पहिला धक्का अवघ्या 1 या धावसंख्येवर बसला. मात्र त्यानंतर कर्णधार के एल राहूल (22 चेंडू 28 धावा) आणि मार्कस स्टोईनिसने 45 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या निकोलस पुरन (18 चेंडू 18 धावा) आणि निकोलस पुरन नाबाद (14 चेंडू 14 धावा) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला.