इराण सरकारने कुस्तीपटूला गुपचूप फासावर लटकावले, ट्रंप यांनी केली होती शिक्षा माफीची मागणी

1532

इराणमध्ये 2018 मध्ये झालेल्या सरकारविरोधी निदर्शनात एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी कुस्तीपटू नावीद अफकारीला गुपचूप फासावर लटकावले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नावीदची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. तसेच या शिक्षेविरोधात जगभरातून आवाज उठवण्यात आला होता. ट्रम्प यांची मागणी किवा जगभरातील विरोधाला न जुमानता इराण सरकारने नावीदला गुपचूप फासावर चढवले आहे. इराणच्या सरकारी वाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेनंतर इराणमध्ये फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे.

इराणमध्ये 2018 मध्ये झालेल्या सरकारविरोधी निदर्शनात एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप नावीदवर होता. फार्स प्रांताचे मुख्य न्यायाधीश काजेम मौसवी यांच्या आदेशानुसर शिराजमधील अदेलाबाद तुरुंगात नावीदला फासावर लटकावण्यात आल्याची माहिती इराणच्या सरकारी वाहिनीने दिली आहे. नावीदच्या फाशीच्या शिक्षेविरोधात सोशल मिडीयावरही आवाज उठवण्यात आला होता. सरकारविरोधातील निदर्शनात सहभागी झाल्यामुळे नावीद आणि त्याच्या भावाला लक्ष्य करण्यात आल्याचे मत सोशल मिडीयावर अनेकांनी व्यक्त केले होते. याप्रकरणी नावीदचे दोन भाऊ अजूनही तुरुंगात आहेत. नावीद अफकारीने हत्येचा गुन्हा कबूल केल्याचे प्रसारण सरकारी वाहिनीवर गेल्या आठवड्यात करण्यात आले होते. त्याच्याकडून हत्येची कबुली घेतल्यानंतर त्याला फासावर लटकावण्यात आले आहे.

इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटीने नावीदला फाशी देऊ नये, अशी मागणी इराण सरकारकडे केली होती. त्याचप्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नावीदची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. अमेरिकेचे परदेशमंत्री माइक पॉम्पिओ यांनी नवीदला फाशी देण्याच्या घटनेबाबत इराण सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. नावीदला 17 सप्टेंबर 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन न्यायालयांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. तर त्याचे भाऊ वाहिद अफकारीला 56 वर्षे 6 महिने आणि हबीब अफकारीला 24 वर्षे 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इराण सरकारने कुस्तीपटूला गुपचूप फासावर लटकावल्याचा जगभरातून निषेध होत आहे. तसेच फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी इराणमध्ये होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या