
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रख्यात साहित्यिक विश्राम बेडेकर लिखित आणि दिग्दर्शित 1967 मध्ये रंगमंचावर सादर झालेले दाजी भाटवडेकर, अरविंद देशपांडे, सतीश दुभाषी, दामू केंकरे, जयंत सावरकर व मंगला संझगिरी यांच्या अभिनयाने गाजलेले ‘वाजे पाऊल आपुले’ तसेच लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेले ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर सादर होणार आहे.
अष्टपैलू साहित्यिक, नाटककार विश्राम बेडेकर यांनी लिहिलेल्या विनोदी ‘वाजे पाऊल आपुले’ या तुफान गाजलेल्या लोकप्रिय नाटकाचे प्रयोग येत्या 24 नोव्हेंबरपासून सुरू होत असून ते संपूर्ण नव्या संचात येत आहे. जुन्या संचात काम केलेले आणि सध्या हयात असलेले एकमेव जयंत सावरकर हेच या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून त्यात त्यांनी तेव्हा केलेलीच भूमिका ते आताही या नाटकात करीत आहेत. अभिनेते अभिजित चव्हाण या नाटकातली भगवंत ही मध्यवर्ती भूमिका करीत असून त्यांच्या जोडीला पूर्णिमा तळवलकर सुशीलाची व्यक्तिरेखा साकारत आहेत.
या संस्थेच्या इतर दर्जेदार – लोकप्रिय नाटकांची लवकरच पुनर्निर्मिती होणार असल्याचे संकेत प्रमोद पवार यांनी दिले.
‘टिळक आणि आगरकर’ हे सुमारे तीन दशकांपूर्वी साहित्य संघाने रंगभूमीवर आणलेले नाटक थोड्या वेगळ्या स्वरूपात रंगमंचावर येत आहे. त्याचे अभिवचनाचे प्रयोग प्रथम होणार आहेत त्यानंतर हे नाटक नव्या संचात संघातर्फे सादर केले जाणार आहे. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेलं हे नाटक दिग्दर्शित करण्याचे शिवधनुष्य ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटाचे संवादवार कौस्तुभ सावरकर यांनी पेलले आहे.




























































