अपघातातील मृतांच्या वारसांना 22 वर्षांनंतर न्याय; उच्च न्यायालयाचे विमा कंपनीस पावणेदोन कोटी देण्याचे आदेश

सैन्य दलातील कॅप्टन शैलेंद्र करंदीकर, त्यांची पत्नी सोनाली, दोन महिन्याचे बाळ, नातेवाईक वैजयंती माधव आखवे या पाचजणांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना 22 वर्षांनंतर न्याय मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाने विमा कंपनीस एक कोटी 75 लाख 88 हजार रुपये भरपाई, त्यावर 2003 पासून साडेसात टक्के दराने व्याज देण्याचा आदेश दिला.

कॅप्टन शैलेंद्र, पत्नी सोनाली, दोन महिन्याचे बाळ सुमेन, नातेवाईक वैजयंती आखवे आणि त्यांचा मुलगा देवधर असे सर्वजण 28 जुलै 2002 रोजी व्हॅनमधून नरसिंहवाडीला गेले होते. देवदर्शन घेऊन परत येताना सांगली आकाशवाणीजवळ समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, व्हॅनमधील देवदत्त आखवेवगळता पाचजणांचा जागीच अंत झाला. त्यामुळे सांगलीवर शोककळा पसरली होती.

अपघातप्रकरणी करंदीकर यांच्या आई-वडिलांनी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. 2003 मध्ये सर्वांना मिळून 56 लाख 78 हजार, पाचशे रुपये नुकसानभरपाईचा आदेश दिला. या निकालाविरुद्ध रक्कम वाढवून मिळण्यासाठी करंदीकर व आखवे कुटुंबाकडून मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. विमा कंपनीनेही उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी विमा कंपनीचे अपील फेटाळले. परंतु सांगलीतील न्यायाधिकरणाच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायनिवाडा विचारात घेऊन करंदीकर, आखवे कुटुंबाचे अपील मंजूर केले. वाढीव रक्कम एक कोटी 75 लाख 88 हजार 939 रुपये आणि त्यावर दावा दाखल झालेल्या तारखेपासून साडेसात टक्के व्याजदराने नुकसानभरपाई देण्याचा आदेश विमा कंपनीला दिला. अपघातानंतर मृतांच्या वारसांना 22 वर्षांनंतर उच्च न्यायालयाने न्याय दिल्याच्या घटनेचा विमा कंपनीस मोठा धक्का मानला जात आहे.