
मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कांगा लीगच्या बाद फेरीच्या लढती रविवारी पार पडल्या आहेत. पुढील सहा रविवारी या स्पर्धेच्या लढती सुरू राहणार आहेत. पण महाराष्ट्र सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आल्यास या लढती रद्द किंवा पुढे ढकलण्यात येतील, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.
137 संघ अन् 50 सामने
कांगा लीगच्या बाद फेरींमध्ये 137 संघांचा सहभाग आहे. तसेच आजपासून पुढील सहा रविवारपर्यंत तब्बल 50 लढती होणार आहेत. याची सुरुवात 4 एप्रिलला झाली. मुंबईतील विविध मैदानांमध्ये या लढती खेळविण्यात येत आहेत.
लढती रद्द करण्याची मागणी केली नाही
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या स्पर्धेतील लढती रद्द का नाही करण्यात आल्या, असा प्रश्न एमसीए सदस्याला विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, याबाबत कोणत्याही संघाने तक्रार केली नाही. तसेच लढती रद्द करण्यात याव्यात किंवा पुढे ढकलण्यात याव्यात अशीही मागणी कोणाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार या लढती होत आहेत.
प्रवासामुळे चिंता
कांगा लीगमध्ये असंख्य युवा खेळाडूंचा सहभाग असतो. मुंबईतील विविध भागांमधून हे खेळाडू मैदान गाठत असतात. यावेळी हे खेळाडू रेल्वे, रिक्षा, बस यांमधून प्रवास करीत असतात. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे युवा खेळाडूंसाठी प्रवास हा चिंतेचा विषय ठरू शकतो. तसेच लढतीदरम्यान खेळाडू रस्त्यांवरील खाद्यपदार्थ खातात. यामध्ये वडापाव, मसाला डोसा, पानीपुरी, सॅण्डविच, ज्युस यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश असतो. यामधून खेळाडूंना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.




























































