
सामना प्रतिनिधी। कराड
वर्षात शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणाऱया केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱयांना सोयीस्करपणे दुर्लक्षित केले आहे. तशाच पध्दतीने रोजगार निर्मितीमध्ये हे सरकार अयशस्वी झाल्याने कोट्यवधी युवकांची फसवणूक झाली आहे. जसजशा निवडणूका जवळ येतील तसतसे भाजपकडून नवीन जाहीरनामे बाहेर येतील. पण देशातील व राज्यातील जनता मागील निवडणूकातील भाजपच्या जाहीरनाम्याचा जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पाच राज्यातील निवडणूकांच्या निकालातून भाजपविषयी जनतेचा भ्रमनिराशपणा दिसला आहे. सत्ताबदलाचे वारे आता थांबणार नसल्याचे वातावरण देशभर दिसत आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
टाळगाव (ता. कराड) येथे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांच्या आमदार आदर्श ग्राम योजनेतील विविध कार्यक्रमात ते बोलत होते. आ. आनंदराव पाटील, तहसिलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, अजित पालकर, माथाडी नेते पोपटशेठ पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, पैलवान नानासाहेब पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, सदस्या वैशाली वाघमारे, एलआयसीचे शाखा प्रबंधक रामचंद्र भजनावळे, पैलवान तानाजी चवरे, उदय पाटील-उंडाळकर, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे, कराड उत्तर सेवादल कॉंग्रेसचे अध्यक्ष उमेश साळुंखे, झाकीर पठाण, सरपंत मारुती सुतार, संयोजक आण्णासाहेब जाधव, बापूराव काटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षात लोकहिताचे कोणतेही काम केलेले नाही. राज्यात प्लास्टीक बंदीसाठी मंत्री रामदास कदम यांनी धाडसी पाऊल टाकले. त्यांच्यामागे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे असल्यामुळे त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. प्लॅस्टीक बंदीचा जनतेला त्रास होत असला, तरी निर्णय हिताचाच आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणूकांच्या अचारसंहितेआधी निधीची उपलब्धता न बघता भाजप सरकारकडून मोठमोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. बेरोजगारी व शेतीचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. त्यातच राज्यात पाण्याचा दुष्काळ भेडसावत आहे. मी मुख्यमंत्री असताना पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न यशस्वीपणे हाताळला. 10 लाख जनावरे छावण्यांमध्ये सांभाळली. त्यामधील एकही जनावरं दगावले नाही. पण भाजप सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या राज्यात 17 लाख टन चाऱयाची टंचाई आहे. इतर राज्यातून चारा आयात केला तरी पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आ. आनंदराव पाटील म्हणाले, ज्या माणसांना आम्ही व्यासपीठावर सन्मान दिला. तीच मंडळी पृथ्वीराज यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. त्यांनी यशवंतराव मोहितेंचा विचार का सोडला याचे उत्तर द्यावे. अजितराव पाटील-चिखलीकर म्हणाले, भावी मुख्यमंत्र्यांना कराड दक्षिणमधील जनता पुन्हा मतदान करणार आहे.
रामचंद्र भजनावळे, तानाजी चवरे, विद्याताई थोरवडे यांची भाषणे झाली. यावेळी . चव्हाण यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटने झाली. गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच योजनेतून ग्रामपंचायतीस घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. संयोजक आण्णासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब जाधव, विनोद पाटील, बाजीराव देसाई, प्रकाश पाटील यांनी स्वागत केले. धनाजी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

































































