
व्यावसायिक केतन अगरवाल याच्या हत्येच्या गुन्ह्याचा कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून कोणाचीही मदत न घेता, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी संपूर्ण कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. हत्येच्या प्रकरणाचा उलगडा करताना ग्रामीण पोलिसांनी पारंपरिक ‘पोलिसी खाक्याचा’ अवलंब न करता मानसशास्त्रीय पद्धतीने चौकशी केली. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपी हळूहळू बोलते झाले आणि नियोजनबद्ध हत्येचा संपूर्ण कट उघडकीस आला.
केतन अगरवालचा दि. १८ जूनला लोहगडावर अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव सिया गोयलने केला होता. मात्र सुरुवातीपासूनच केतनच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यातच बाली येथे होणाऱ्या प्री-वेडिंग शूटपूर्वी केतनचा पासपोर्ट हरवल्याची बाब आणि लोहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ उन्हात हुडी जॅकेट परिधान करून चेहरा झाकलेला संशयित सीसीटीव्हीत कैद झाला. पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपासाला गती देऊन मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि दोघांच्या हालचालींचे विश्लेषण केले. घटनेपूर्वी व घटनेनंतरच्या त्यांच्या संपर्कातून अनेक संशयास्पद बाबी उघडकीस आल्या. त्यामुळे हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले.
मानसिक, भावनिक आणि परिस्थितीजन्य प्रश्नांचा आधार
सिया आणि चेतन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर दोघांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. तपासात दोघांकडून पोलिसांना मिळतीजुळती उत्तरे मिळाली. मात्र पोलिसांनी मानसिक, भावनिक आणि परिस्थितीजन्य प्रश्नांचा आधार घेत चौकशीची दिशा बदलली. त्यांच्या उत्तरांमधील साम्यता, जुळता घटनाक्रम आणि उपलब्ध पुरावे यांची सांगड घालत पोलिसांनी कटाचा उलगडा केला. सिया आणि चेतन यांच्यात झालेल्या फोनवरील संभाषणांसह चॅटिंगचे महत्त्वाचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले. डिजिटल पुराव्यांमुळे गुन्ह्याची साखळी अधिक भक्कम झाली आहे.
लुल्लानगरात सियाला नेऊन सीन रिक्रिएशन
केतन अगरवालला लोहगडावरून ढकलण्यापूर्वीच आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी ३० मेपूर्वी कोंढवा परिसरातील लुल्लानगरातील फखरी रस्ता-बकरी हिल परिसरात प्रत्यक्ष सराव केला होता. त्यानंतर संपूर्ण नियोजन करून १८ जूनला केतनला लोहगडावर नेऊन दरीत ढकलण्यात आले. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (दि. २ जुलै) सियाला घटनास्थळांसह लुल्लानगर परिसरात नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन केले. या प्रक्रियेत आरोपींकडून संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना करण्यात आली.






























































