
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात लिटीवाडीनजीक अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप ओळख पटलेली नाही.
आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांना हा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी पोलिसांना खबर दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू केला आहे.
मृत इसमाच्या डोक्याला मार लागल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले. खेड पोलिसांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक दुपारी दीड वाजता घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागरात नेला. घटनास्थळापासून काही अंतरावर मुंबई-गोवा महामार्गाचे व कशेडी बोगद्याचे काम सुरू आहे. येथील अधिकाऱ्यांकडे देखील पोलिसांनी मृत इसमाची ओळख पटवण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.






























































