
हरिद्वारमध्ये कुंभ मेळाव्यादरम्यान झालेल्या बनावट कोरोना चाचणी घोटाळ्या प्रकरणाच्या तपासात सोमवारी एसआयटीला मोठे यश मिळाले आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना उत्तर प्रदेशातील नोएडा शहरातून अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. एसआयटीच्या या कारवाईबाबत माहिती देताना एसएसपी योगेंद्र सिंह रावत म्हणाले की, शरद पंत आणि मल्लिका पंत अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एसआयटी टीम शरत आणि मल्लिका या दोघांनाही हरिद्वारला घेऊन येत असून येथे त्यांची सखोल चौकशी केली जाईल. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना पकडण्यासाठी एसआयटी दिल्लीतच होती.
काय आहे प्रकरण?
कोरोनाच्या काळात हरिद्वार कुंभ मेळाव्यात येणाऱ्या भाविकांसाठी कोरोना तपासणीचा अहवाल अनिवार्य करण्यात आला होता. कुंभमधील कोरोना चाचणीचे कंत्राट मॅक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसला देण्यात आले होते. या कंपनीने चाचणीत कोटींची फसवणूक केली होती.
असा आला घोटाळा उघडकीस…
फरीदकोट येथील एका रहिवाशाने आपली कोरोना चाचणी केली नसताना त्याला आपला कोरोना अहवाल घेण्यास या, असा मेसेज आला. ज्यानंतर या व्यक्तीने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला, ज्यामध्ये सुमारे एक लाखाहून अधिक बनावट रॅपिड अँटीजेन चाचण्या आढळल्या.
हरिद्वारमध्ये कोरोना चाचणीत घोटाळा समोर आल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आदेशानुसार मॅक्स कॉर्पोरेट, नलवा लॅब आणि डॉ. लाल चांदणी लॅब सेंट्रल दिल्ली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर एसएसपींनी सखोल तपासासाठी एसआयटी टीम तयार केली होती. एसआयटीच्या स्थापनेनंतर भिवानीच्या डेल्फिशा लॅबचा ऑपरेटर आशिष वशिष्ठ याला सर्वात आधी अटक करून चौकशी करण्यात आली. यानंतर मॅक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे भागीदार शरत आणि मल्लिका यांचा शोध सुरू झाला. ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून याशी संबंधित इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहे.


























































