‘लगान’ या चित्रपटातील रामसिंह या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे मंगळवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.
गेल्या वर्षभरापासून जावेद यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. ते पूर्णपणे अंथरुणाला खिळून होते. सांताक्रुझमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची दोन्ही फुप्फुसे निकामी झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ā ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती अभिनेते जावेद खान अमरोही यांच्या निकटवर्तीयाने दिली. ‘एफटीआयआय’मधून प्रशिक्षण घेऊन अभिनय क्षेत्रात उतरलेले जावेद खान एWशीच्या दशकातील लोकप्रिय चरित्र कलाकारांपैकी एक होते. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनचे ते सदस्य होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी दीडशेहून अधिक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. यात वो सात दिन (1983), राम तेरी गंगा मैली (1985), त्रिदेव (1989), हम है राही प्यार के (1993), अंदाज अपना अपना (1994), कुली नं. 1 (1995), इश्क (1997), लगान (2001), चक दे इंडिया (2007), फिर हेराफेरी आदी (2006) चित्रपटांचा समावेश आहे. 2020 साली प्रदर्शित झालेला ‘सडक 2’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. ‘ये जो है जिंदगी’, नुक्कड’, ‘मिर्झा गालिब’ या मालिकांमध्येही त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती.






























































