रासायनिक सांडपाण्याच्या जलवाहिनीला गळती, कोतवलीची सोनपत्रा नदी प्रदूषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे सोनपत्रा नदी प्रदूषित झाली आहे. यामुळे खाडी किनाऱ्यावरील भोई समाज बांधवांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणत मासे मरत असल्याने मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भोई समाजाची उपासमार होत आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीला गळती लागू नये म्हणून औद्योगीक विकास महामंडळाने आवश्यक खबरदारी घ्यावी अशी मागणी भोई समाजबांधवांनी केली आहे.

दाभोळ खाडीकिनारी राहणाऱ्या भोई समाजबांधवांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. दाभोळ खाडीत मासेमारी करून हा समाज आपला उदरनिर्वाह करत आला आहे. जो पर्यंत लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीत जलप्रदूषण होत नव्हते तो पर्यंत भोई समाज बांधवांचा व्यवसाय उत्तमरित्या सुरु होता. मासेमारी करून आनंदात जीवन व्यतीत करणाऱ्या भोई समाजबांधवांची कोणतीही तक्रार नव्हती. मात्र लोटे ओद्योगीक वसाहतीतील रासायनिक कारखान्याचे सांडपाणी सोनपत्रा नदीमार्गे दाभोळ खाडीत सोडण्यास सुरवात झाली आणि भोई समाज बांधवांच्या व्यवसायाला ग्रहण लागले. दाभोळ खाडीत होणाऱ्या जलप्रदूषणचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आणि आनंदात जीवन व्यतीत करणाऱ्या भोई समाजबांधवांवर उपासमारीची वेळ आली.

गेली अनेक वर्षे येथील भोई समाज जलप्रदूषणचा सामना करत आहे. रासायनिक कारखानदारांकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येथील मच्छीमार व्यावसायिकांनी अनेकदा आंदोलनाचे हत्यार उपसले. जलप्रदूषणचे मूळ असलेल्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला टाळे ठोकण्यात आले. मात्र मुजोर कारखानदारांनी गरिबीने पिचलेल्या भोई समाजबांधवांची आंदोलने वेळोवेळी चिरडून टाकण्यात धन्यता मानली. भोई समाज बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फुटावी यासाठी भोई समाजबांधवांनी राजकीय पुढाऱ्यांची मदत घेतली तिथेही भोई समाजबांधवांच्या वाट्याला निराशाच आली.

लोटे आद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यावर सामुदायीक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते पाणी मोठ्या जलवाहिनीने खोल समुद्रात सोडण्यात येते. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया झाल्यावर ज्या जलवाहिनीद्वारे हे पाणी खोल समुद्रात सोडले जाते, त्याच जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने दाभोळ खाडीत वारंवार जलप्रदूषण होऊन मासे मारत आहेत, परिणामी येथील भोई समाज बांधवांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. दाभोळ खाडीत वारंवार होणारे जलप्रदूषण थांबवावे आणि धोक्यात आलेला मासेमारी व्यवसाय वाचवावा अशी येथील भोईसमाजाची मागणी आहे. मात्र कारखानदार किंवा आद्योगिक विकास मंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने भोई समाज बांधवांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मौजे कोतवली येथील सोनपात्रा नदीमध्ये पाईप लाईनचे नट बोल्ट निखळून पाईपलाईनला गळती लागली. आणि नदीपात्रात मोठया प्रमाणात फेस जमा झाला होता. ही बातमी संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे याना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व परीस्थीतीची पाहणी केली. परिस्थिती गंभीर असल्याने त्यांनी लगेचच संबंधित सीईटीपी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात यावा अशी मागणी केली. त्या नुसार एमआयडीसीचे हळदणकर, सीईटीपीचे आहिर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणचे शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी कोतवली गावच्या सरपंच तांबे, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष संजय जुवळे, उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, सचिव दिलीप दिवेकर, अ. दा. भोई समाज कार्यकारिणी सदस्य दीपक पारधी उपस्थित होते.