
गेल्या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोक आपापल्या घरात अडकून पडले. ऑफिसचे काम घरातून करू लागले. अशा परिस्थितीत लोकांसमोर मनोरंजनाचं दुसरं कुठलंही साधन नव्हतं. त्यामुळे जगभरातील लोकांनी टीव्ही आणि मोबाईलवर जास्तीत जास्त वेळ घालवला. मोबाईल ऍप्सचे तर विचारू नका. लोकांचा मोबाईल ऍप्सवर जणू जीव जडला. त्यांनी दिवसाला सरासरी चार तास मोबाईल ऍप्सवर घालवलेत. फेसबुक, यू-टय़ूब अशा ऍप्सचा वापर करणाऱयांची संख्या तर दोन वर्षांत प्रचंड वाढली आहे.
‘ऍप ऍनी’चा अहवाल नुकताच आला आहे. अहवालानुसार मोबाईल ऍप्सवर लोकांचा सरासरी 4.2 तासांएवढा वेळ जात आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही वाढ 30 टक्के आहे. हिंदुस्थानींचा विचार केला तर 2019 च्या तिमाहीच्या तुलनेत 2021 च्या तिमाहीत लोकांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक वेळ ऍप्सवर घालवला आहे.
जानेवारी ते मार्च 2021 या काळात अमेरिका, तुर्की, मेक्सिको आणि हिंदुस्थानच्या लोकांनी दिवसाला चार तास तर ब्राझील, दक्षिण कोरिया, इंडोनेशियाच्या लोकांनी दिवसाला पाच तास मोबाईल ऍप्सवर घालवले आहेत. या काळात ऍपल ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअर यामधून टिकटॉक, फेसबुक आणि यूटय़ूब सर्वाधिक डाऊनलोड झाले.
ऍप ऍनी अहवालानुसार, पाश्चिमात्य मार्केटमध्ये टेलिग्राम आणि सिग्नल ऍपचा बोलबाला दिसून आला. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि त्याखालोखाल अमेरिका या देशांमध्ये सिग्नल सर्वाधिक डाऊनलोड झाले.
हिंदुस्थानात टिकटॉकवर बंदी असल्याने त्याला पर्याय म्हणून मार्केटमध्ये आलेल्या ‘एमएक्स टकाटक’ ऍप जास्त प्रमाणात डाऊनलोड झालेय. डाऊनलोड चार्टमध्ये टिकटॉक अव्वल तर त्याखालोखाल फेसबुक आणि इन्स्टाग्राम ऍप आहेत.




























































