Lok Sabha Election 2024 : सोलापुरात 21, माढय़ात 32 उमेदवार रिंगणात

सोलापूर लोकसभा मतदार संघात 21, तर माढा मतदारसंघात 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड, तर सांगोल्यातील ऍड. सचिन देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सोलापूर मतदारसंघातून 11, तर माढय़ातून आज  6 उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे तर भाजपाचे राम सातपुते या दोन आमदारांमध्ये थेट लढत होणार आहे. माढय़ात महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते-पाटील, तर भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होत आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. सोलापूर मतदारसंघासाठी 53 अर्ज दाखल केले होते. त्यातील 9 जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे 32 उमेदवार रिंगणात होते. यातील 11 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला असून, यात वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांचा समावेश आहे. आता 21 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

माढा मतदारसंघासाठी 55 अर्ज दाखल केले होते. यातील 4 जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील सहाजणांनी अर्ज माघार घेतल्याने 32 उमेदवार रिंगणात आहेत. सांगोल्यातील शेकापचे ऍड. सचिन देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज माघार घेतले आहे.