महाराष्ट्रातील जनता आता मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही; नाना पटोले यांचा भाजपला इशारा

महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, कांद्यावरील निर्यातबंदी उठवताना महाराष्ट्रातला शेतकरी नाही तर फक्त गुजरात आठवला. पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली का? महाराष्ट्रातील जनता आता मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांचा सातत्याने अपमान केला. शिवाजी महाराज हे भाजपला फक्त मतांसाठी हवे आहेत, निवडणुका आल्या की छत्रपतींचे नाव घेता व नंतर त्यांचा अपमान करता हीच भाजपची नीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वर्षांत सोलापुरात पाचवेळा आले, पण 5 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत. शहराला सात दिवसांतून एकदा पाणी येते, हर घर नल, नल में जल ही मोदी यांची योजना सोलापुरात फेल गेली आहे. सोलापुरात नल है पर नल में जल नही, अशी परिस्थिती आहे, असे नाना पटोले म्हणाले.

भाजप, आरएसएस आरक्षणाचे खरे विरोधक

पंतप्रधान मोदी धादांत खोटे बोलत आहेत. खोटे बोलण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. काँग्रेस पक्ष आरक्षण संपवत आहे हा मोदी यांचा आरोप अत्यंत चुकीचा व हास्यास्पद आहे. मागील 10 वर्षांत धनगर, आदिवासी, मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची घोर फसवणूक करणाऱया भाजपवर आता जनता विश्वास ठेवणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाचा घोळ घालून राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्याचे पाप याच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व भाजपने केले आहे. आरक्षणाचे खरे विरोधक भाजप, आरएसएस व नरेंद्र मोदी आहेत, असे पटोले म्हणाले.