Lok Sabha election 2024 : मोदींनी तरुणांना नोकऱ्या नाही, तर जुगाराची सवय लावली, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

दरवर्षी दोन कोटी नोकऱया मिळतील अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्तेत येताना केली होती; पण त्यांच्या दहा वर्षांच्या काळात कोणतीच नोकरभरती झाली नाही. उलट मोदी सरकारने तरुणांना जुगाराच्या वाईट सवयी लावल्या. त्यासाठीच बेधडकपणे जुगाराच्या जाहिराती सुरू आहेत, असा आरोप कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस सत्तेत असताना कधीही जुगार, दारू आदींच्या जाहिराती होत नव्हत्या, पण आता जुगाराच्या जाहिराती माध्यमावर चालू आहेत. कारण जुगार पंपन्यांकडून भाजपाला इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून 1400 कोटींची देणगी दिली गेली. ‘चंदा दो धंदा लो’ असा उद्योग मोदींनी दहा वर्षांत केला. जुगार उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे काम मोदी सरकारकडून देशात सुरू आहे, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

काँग्रेस जाहीरनाम्याबाबत कायमच प्रयत्नशील राहिली आहे व त्यानुसार कायम अंमलबजावणीसुद्धा केली. काँग्रेसने 70 वर्षांत काय विकास केला हे सांगण्याची गरज नाही, तर देशातील जनताच त्याची उदाहरणाने तुम्हाला सांगत आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

परदेशातील काळा पैसा 100 दिवसांत परत येईल अशी घोषणा केली होती; पण काळा पैसा तर आणला नाहीच, पण काळा पैसावाल्यांना मोदी सरकारने पाठीशी घातले, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

आपला देश हुकूमशाहीकडे निघाला आहे

मोदी सरकारने 10 वर्षांत काय विकास केला हे सांगता येत नसल्यानेच धार्मिक तेढ निर्माण करण्याची भाषा आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये मोदी करत आहेत. अनेक उद्योगपतींचे उद्योग काढून फक्त अदानीला दिले जात आहेत म्हणून बाहेरील देशातील उद्योग भारतात येत नाहीत. आपला देश हुकूमशाहीकडे निघाला आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.