Lok Sabha election 2024 : भाजप सत्तेत आला तर संविधान फाडून फेकून देईल

भाजपा सत्तेत परतला तर गरीब, दलित, आदिवासी आणि ओबीसींना अधिकार देणारे संविधान फाडून फेकून देईल, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मध्य प्रदेशातील भिंड जिह्यातील प्रचारसभेत ते बोलत होते.

भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत उंचावत दाखवली आणि यावेळची लोकसभा निवडणूक सर्वसामान्य नाही तर दोन विचारधारांमधील लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले. संविधानामुळेच गरीब, दलित, आदिवासी आणि ओबीसींना अनेक अधिकार मिळाले आहेत.

संविधानाची ही प्रत फाडून फेकण्याचेच भाजपाचे लक्ष्य असल्याचे राहुल गांधी म्हणाले. आरक्षणावरूनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. जर सत्ताधारी आरक्षणाच्या विरोधात नाही तर मग रेल्वे आणि इतर सरकारी कंपन्यांचे खासगीकरण का सुरू आहे, असा सवालही राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस सत्तेत आली तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत कोटय़वधी महिलांना लखपती बनवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.