Lok Sabha Election 2024 : अखिलेश यादव नाही तेज प्रताप लढणार लोकसभा निवडणूक

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिलेश हे कनौज लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उभे राहतील असे म्हटले जात होते, परंतु समाजवादी पार्टीने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून नव्या यादीनुसार कनौज येथून सपाने तेज प्रताप यादव यांना उमेदवारी दिली आहे. सनातन पांडेय यांनाही सपाने तिकीट दिले असून त्यांना भाजपचे नीरज शेखर हे आव्हान देणार आहेत.

कनौज लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे. 1998 पासून 2014 पर्यंत सलग समाजवादी पार्टीनेच या जागेवर बाजी मारली आहे, परंतु 2019 च्या निवडणुकीत भाजपचे सुब्रत पाठक यांनी कनौज येथून अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यांचा पराभव करून कनौजची जागा खेचून आणली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीची युती होती. या निवडणुकीत डिंपल यादव यांना 5 लाख 50 हजार 734 मते मिळाली होती, तर सुब्रत पाठक यांना 5लाख 63 हजार 87 मते मिळाली होती.